
no images were found
ज्येष्ठ नागरिकांसाठी विद्यापीठात योग व निसर्गोपचार शिबिर संपन्न
ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत शिवाजी विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाकडून अनेक उपक्रम दरवर्षी राबवली जातात. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या निरोगी व निरामय आयुष्यासाठी योग व निसर्गोपचार शिबिर शिक्षणाशास्त्र सभागृहात संपन्न झाले. बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या या शिबिरासाठी फेसकॅामचे समन्वय समितीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दिलीप पेटकर, सचिव श्रीकांत अडिवरेकर व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाचे संचालक डॉ.रामचंद्र पवार उपस्थित होते.
शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या विविध आरोग्य समस्या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या सर्व समस्येवर योग आणि निसर्गोपचारांमधून विना औषधी उपचार कसे केले जातात याचे मार्गदर्शन ॲक्युप्रेशर तज्ञ अरविंद पालके यांनी केले. यावेळी विविध प्रात्यक्षिकाद्वारे निसर्गोपचार,एक्यूप्रेशर व योग याच्या विविध पद्धती ज्येष्ठनां शिकवण्यात आल्या. उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलताना विभागाचे संचालक डॉ.रामचंद्र पवार यांनी विभागाच्या वतीने जेष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या विविध कोर्सची माहिती दिली. यापुढेही ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम राबवण्याचे आश्वासन विभागाच्या वतीने देण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अरविंद पालके यांनी केले. यावेळी टी आर गुरव, श्रीकांत अडिवरेकर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र खैरे यांनी केले तर आभार सहाय्यक प्राध्यापक यशोधन बोकील यांनी मानले. यावेळी, वसंत सिंघण, आर.एम. जाधव, उदय घाटे,सुधाकर भोसले, मंगल पाटील, डॉ.श्वेतालीना पाटील,रामचंद्र पाटील, बाळासाहेब पाटील यांच्यासह योग व निसर्गोपचाराचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.