
no images were found
महाराष्ट्रात आमदारांचे संख्याबळ ३६० होणार ? देवेंद्र फडणवीस
मुंबई : लोकसंख्येच्या आधारे होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेत २०२६ साली राज्यातील विधानसभा मतदारसंघांची संख्या ३६० होणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.२०२६ साली आपल्या विधानसभेत जागा वाढणार आहेत. देशातील सर्वच विधानसभेत जागा वाढणार आहेत. सध्याचे आपले विधानभवन नव्याने येणाऱ्या आमदारांना सामावून घेऊ शकत नाही. सध्याच्या विधानभवनात ३०० आमदारांना बसण्याची व्यवस्था आहे आणि या जागा ३०० च्या वर जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला नवीन विधानभवन बांधावे लागणार आहे, असे फडणवीस यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
महाराष्ट्र विधानसभेचे सध्या २८८ मतदारसंघ आहेत. सध्याची विधानभवनची इमारत आमदारांची संख्या वाढली तर अपुरी पडणार आहे. त्यामुळे विधानभवनसमोरील पार्किंगच्या जागेत नवे विधानभवन बांधण्याची चाचपणी यापूर्वीच सुरू झाली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नवीन संसद भवन तयार केले तेव्हापासूनच राज्यातही नव्या विधानभवनाची चर्चा सुरू झाली होती. आता फडणवीस यांनी त्याबाबत स्पष्ट संकेतच दिले आहेत.
नवीन विधानभवनासाठी लवकरच प्रस्ताव तयार केला जाईल, असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही यापूर्वी स्पष्ट केले होते. नव्या विधानभवनात आमदारांच्या बसण्याच्या व्यवस्थेबरोबरच मंत्री दालन, पक्ष कार्यालये, तसेच विधिमंडळातील विविध कार्यालयांची संख्याही वाढवली जाणार आहे.