
no images were found
कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होणार, आम्ही पलटवार केला तर विरोधकांची पळती भुई थोडी होईल : श्री. राजेश क्षीरसागर
कोल्हापूर(प्रतिनिधी ) : “ लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे खासदार आहेत. आगामी निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघातील लोकसभेची उमेदवारी शिवसेनेलाच मिळणार आणि या जागा शिवसेना जिंकणार. शिवाय जिह्यातील दहा आमदार हे महायुतीचेच होतील. २०१४ मध्ये शिवसेनेचे सहा आमदार जिंकले होते. २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून शिवसेनेचे आठ आमदार निवडून येतील.”अशी राजकीय टोलेबाजी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली. महापालिकेच्या निवडणुकीनंतर कोल्हापूर महापालिकेचा महापौर शिवसेनेचा असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी विविध विषयावर स्पष्टपणे मते मांडली. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार लोकांच्या हितासाठी काम करणारे आहे.कोल्हापूरच्या खंडपीठासह जनतेच्या हिताचे सगळे निर्णय येत्या काही महिन्यात मार्गी लागतील, अन्यथा निवडणुकीला सामोरे जाणार नाही’असे क्षीरसागर यांनी सांगितले. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात शिवसेना भक्कम आहे. शिवसेनेचे दोन्ही खासदार, आमदार, माजी आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शिवसेनेसोबत आहेत. संघटन भक्कम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भक्कम नेतृत्व लाभलेले आहे. जनतेसाठी पहाटेपर्यंत काम करणारा मुख्यमंत्री राज्याला मिळाला आहे. २०२४ नंतरही शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी असतील. ’असेही क्षीरसागर यांनी सांगितले.
श्रेयवादासाठी नाही शहरविकासासाठी काम करतोय
कन्व्हेन्शन सेंटर, गांधी मैदान विकास, रंकाळा सुशोभिकरणाला होणाऱ्या विरोधावरुन क्षीरसागर म्हणाले, ‘शिवसेना भाजप महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यात जवळपास ५०० कोटी रुपयांचा निधी विकासकामांना मंजूर झाला आहे. प्रत्येक कामाचे योग्य नियोजन केले आहे. यामुळे निधी कोण आणत आहे, हे जनतेला ज्ञात आहे. केवळ कागद दाखवून निधी मिळत नाही. त्यासाठी सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा करावा लागतो.प्रश्नांची दाहकता मांडावी लागते. मात्र शहरात संभ्रम माजविणारी आणि विकासकामांना विरोध करणारे टोळके तयार झाले आहे. राजकीय विरोध समजू शकतो, पण विकासकामांत कोणी आडवे येऊ नये. मी, श्रेयवादासाठी नाही शहरविकासाच्या भूमिकेतून काम करत आहे. शहर विकासाच्या योजनांना उठसूट विरोध करणे हे चांगल्या राजकारणाचे लक्षण नाही. काही मंडळी सातत्याने निगेटिव्हिटी पसरवत असतात. त्यांची भूमिका शहर विकासाला मारक ठरत आहे. आमचा भर विकासकामांवर आहे, त्यामुळे विरोधकांच्या टीकेला उत्तर द्यायचे नाही असे ठरविले आहे. आम्ही पलटवार करू लागलो तर विरोधकांना पळती भुई थोडी होईल’.
कन्व्हेन्शन सेंटरचे विस्तारीकरण, २४३ कोटीचा आराखडा
कोल्हापूर कन्व्हेन्शन सेंटर हे शहराचे वैभव ठरणार आहे. सर्व घटकांना उपयुक्त कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापूरच्या विकासाचे मॉडेल ठरेल असे सांगत १०० कोटीच्या कन्वहेन्शन सेंटरचा विस्तार करुन आता २४३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात येत आहे. या ठिकाणी क्रिडाई संस्था, बांधकाम व्यावसायिकांसाठी दालनची उभारणी, अद्ययावत नाट्यगृह अंतर्गत २००० प्रेक्षक क्षमतेचे सभागृहाचा समावेश आहे. याशिवाय कोल्हापूर फुटबॉल अॅकेडमीसाठी ३०० कोटी रुपये मिळणार आहेत. शेंडापार्क येथे २० एकर जागेत फुटबॉल अॅकेडमी प्रस्तावित आहे.
पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, राजेखान जमादार, शहराध्यक्ष रणजित जाधव, शिवाजी जाधव, किशोर घाटगे, उदय भोसले आदी उपस्थित होते.