
no images were found
संधी वारंवार मागायची नसते, आणि मागितली तरी ती द्यायची नसते : शरद पवार
सुप्रिया सुळेंनी पुण्यात बोलताना अजित पवार आमचे नेते असून पक्षात फूट पडलेली नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यासंदर्भात बारामतीमध्ये शरद पवारांना पत्रकार परिषदेत विचारणा केली असता शरद पवारांनी त्या वक्तव्याचं समर्थन करताना पक्षात फूट पडली नसल्याचं स्पष्ट केलं होतं. शरद पवारांनीही अजित पवार पक्षाचे नेते असल्याचं मान्य केल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. २०१९प्रमाणे अजित पवार पुन्हा माघारी येणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात होता. त्यामुळे नेमकी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय आहे? याविषयी संभ्रम निर्माण झाला होता.
त्यासंदर्भात साताऱ्याच्या दहिवाडीमध्ये पत्रकार परिषदेत शरद पवारांना पुन्हा विचारणा केली असता त्यांनी हे विधान फेटाळतानाच अजित पवारांना पुन्हा संधी देणार नसल्याचं स्पष्ट केलं.
दरम्यान, पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा असं होणार नाही हे ठरल्याचं शरद पवारांनी सांगितलं. त्यामुळे संधी वारंवार मागायची नसते आणि द्यायचीही नसते असं सांगत शरद पवारांनी अजित पवारांबाबतची आपली ठाम भूमिका मांडली आहे. “संधी वारंवार मागायची नसते, आणि मागितली तरी ती द्यायची नसते. आमची भूमिका स्पष्ट आहे”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.