
no images were found
छगन भुजबळांना मंत्रिपदावरून हटवा : ब्राह्मण महासंघाची मागणी
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरस्वती माता व ब्राह्मण समाजाविरोधात वक्तव्य करून ब्राह्मण व मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र आखले आहे. यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या नाशिकमधील बैठकीत करण्यात आली. येत्या आठ दिवसांत निर्णय न घेतल्यास मंत्रिमंडळावर मोर्चा काढण्याचा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला आहे.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे नाशिकमधील बारा बंगला परिसरातील ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेत भुजबळांच्या निषेधार्थ सभा घेण्यात आली. यावेळी ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आनंद दवे, नाशिकचे अध्यक्ष बाळासाहेब पाठक, महंत सुधीरदास पुजारी, महंत अनिकेतशास्त्री देशपांडे, कुमार मुंगी, मनसेचे उपाध्यक्ष पराग शिंत्रे, ‘निमा’चे अध्यक्ष धनंजय बेळे, शुल्क यजुर्वेद ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, श्यामसुंदर जोशी, सोनाली कुलकर्णी, गजेंद्र घोडके, कैलास बारवकर व्यासपीठावर उपस्थित होते. निषेध सभा पार पडल्यानंतर ब्राह्मण महासंघातर्फे अभ्यंकर सभागृहाच्या प्रांगणात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी भुजबळांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.