
no images were found
बाळूमामांच्या दर्शनाला निघाले कार झाडावर आदळली ४ जणांचा जागीच अंत
सातारा : कुरोली व बनपुरी येथील भाविक बाळूमामाच्या मेंढराचं देवस्थान असलेल्या लाकरेवाडी येथे देवदर्शनासाठी जात होते. सातारा जिल्ह्यातील धोंडेवाडी (ता. खटाव) येथील पेट्रोल पंपानजीक सूर्याचीवाडी हद्दीत पहाटे साडेपाचच्या सुमारास ओमिनी कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला.
या अपघातात चार जण जागीच ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सिद्धेश्वर कुरोली येथील पांडुरंग देशमुख यांच्या ओमिनी कारमधून कुरोली व बनपुरी येथील भाविक बाळूमामाच्या मेंढराचं देवस्थान असलेल्या लाकरेवाडी येथे देवदर्शनासाठी जात होते. दरम्यान, पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास खटाव तालुक्यातील धोंडेवाडीजवळील सुर्याजीवाडी हद्दीत कार रस्त्याकडेच्या झाडावर जोरात आदळून अपघात झाला. या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले, तर चौघेजण गंभीर जखमी आहेत. अपघातात एक पुरुष व तीन महिला जागीच ठार झाल्या. जखमींना वडूज आणि सातारा येथील रुग्णालयांमध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरु असताना वडूज येथील रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये दहिवडी येथील एका प्रवाशाचा समावेश आहे.
अपघातात ठार झालेल्या तथा जखमी झालेल्यांची नावे अद्याप स्पष्ट झाली नाहीत. मात्र, हे सर्वजण बनपुरी व कुरोली येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा अपघात पहाटेच्या वेळेस कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अपघाताचा तपास वडूज पोलीस करत आहेत.