no images were found
अखेर.. जयप्रभा स्टुडीओ वाचवला : श्री.राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : कोल्हापूर शहराची अस्मिता असणारा आणि चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार अशा जयप्रभा स्टुडीओच्या जागेचा प्रश्न गेली वर्षभर प्रलंबित होता. जयप्रभा स्टुडीओची जागा कोल्हापूरची अस्मिता असून, कोल्हापूरवासीय आणि कलाकारांच्या भावनांचा अनादर होणार नाही. स्टुडीओच्या जागेचा प्रश्न मार्गी लावून, स्टुडीओच्या विकासासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली होती. त्यांच्या या प्रयत्नास यश आले असून, मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागाने दि.०३ ऑगस्ट २०२३ रोजीच्या पत्रान्वये आदेशित केले आहे. यामध्ये या जागेबाबत निर्णय घेण्याचे दोन पर्याय शासनाने कोल्हापूर महानगरपालिकेस दिले आहे. पर्याय एक नुसार कोल्हापूर महानगरपालिकेने जयप्रभा स्टुडीओच्या (बी वॉर्ड मधील सि.स.नं.२८१४क/१) जागेच्या मोबदल्यात श्री.महालक्ष्मी स्टुडीओ एल.एल.पी.फर्म यांना पर्यायी जागा परस्पर सहमतीने उपलब्ध करून देऊन सदर जागा ताब्यात घ्यावी. पर्याय दोन नुसार पर्याय एक प्रमाणे कार्यवाही शक्य नसल्यास, सदर जागेतील हेरीटेज जागेच्या संपादनाच्या मोबदल्यात उर्वरित जागेत जमीन मालकास बांधकामास परवानगी देवून विकास हस्तांतरणीय हक्क (TDR) उपलब्ध करून देण्यात यावा. असा निर्णय घेतल्याने जयप्रभा स्टुडीओच्या जागेचा विषय निकाली काढण्यात श्री.राजेश क्षीरसागर यांना यश आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, कलाकार आणि मराठी चित्रपट सृष्टीच्या उन्नतीसाठी शिवसेना नेहमीच प्रयत्नशील आहे. जयप्रभा स्टुडीओच्या जागेबाबत लोकभावनांचा आदर ठेवून खरेदीदार महालक्ष्मी फर्म या कंपनीस पर्यायी जागा स्विकारून स्टुडीओची जागा शासन ताब्यात देण्याबाबत आपण सुचना दिल्या होत्या, त्यास संबधित फर्मने सहमती दर्शवित कोल्हापूर महानगरपालिकेस जागा ताब्यात देणेबाबत पत्रव्यवहार केला आहे. कोल्हापूर महापालिका प्रशासनासही पर्यायी जागा देवून स्टुडीओची जागा महापालिकेकडे वर्ग करण्याबाबतच्या यापूर्वी सूचना दिल्या होत्या त्यानुसार नगरविकास विभागानेही प्रस्ताव मागवून सद्यस्थितीत या जागेसंदर्भात दोन पर्याय देत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहे. याबाबत मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांचे करवीरवासीय जनता, कलाकार यांचेवतीने जाहीर आभार मानत आहे.
वास्तविक पाहता हा प्रश्न निकाली लागण्याच्या स्थितीत असताना यावर सकारात्मक कार्यवाही होत असताना यास वेगळे वळण देण्याचा प्रयत्न काही कॉंग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आला. भारतरत्न लता मंगेशकर आणि महालक्ष्मी एल.एल.पी. फर्म मध्ये कायदेशीर व्यवहार झाला आहे. भारतीय कायद्यानुसार १८ वर्षे पूर्ण झालेल्या सज्ञान व्यक्तीला जागा खरेदी -विक्री करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. अशी सत्यपरिस्थिती असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदनामी करण्याच्या हेतूनेच जनता आणि कलाकारांमध्ये गैरसमज पसरविण्याचा डाव आखला गेला. कलाकारांनी केलेल्या आंदोलनास आपण तात्काळ भेट देवून सदर स्टुडीओच्या विकासासाठी आपण जनता आणि कलाकारांच्या सोबत असल्याचे जाहीर केले होतेच यासह हा प्रश्न आपणच मार्गी लावू, अशी ग्वाही दिली होती. मीही कार्यकर्त्याचा आमदार झाल्याने चळवळीची जाण आहे. कोल्हापूरच्या प्रत्येक चळवळीत आपला सहभाग आहे. त्यामुळे जनभावनांचा अनादर होणार याची नेहमीच मी दक्षता घेत आहे. या जागेबाबत शासनाने दिलेला निर्णय हा जनभावनांचा विजय असून, यापुढेही जावून कोट्यावधींचा निधी या स्टुडीओस उपलब्ध करून या जागेत चित्रिकरणासाठी व कलाकारांसाठी आवश्यक बाबी पुरवून स्टुडीओचा विकास करण्यास प्रयत्नशील आहे. आगामी काळात याची दखल निश्चितच कोल्हापूरची सुजाण जनता घेईल.
प्रसिद्धीमाध्यमांना एक विनंती आहे कि, ज्या पद्धतीने जयप्रभा स्टुडीओच्या प्रकरणात आपले नांव आल्यानंतर मी जनभावनांचा आदर ठेवून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याचपद्धतीने जिल्ह्यातील इतर काही नेत्यांनीही शासनाच्या, देवस्थान समितीच्या हजारो एकर जागा नाममात्र भाडेतत्वावर घेतल्या असून, यासंदर्भातील माहिती जनतेपर्यंत पोहचवावी. शहरातील अनेक मोठ्या मालमत्तांचा घरफाळा सह इतर कर प्रलंबित असल्याचेही निदर्शनास आले आहे याबाबत जनजागृती मोहीम व्हावी या हेतूने प्रसिद्धीमाध्यमांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यानीन केले आहे.