no images were found
एनएसई नोंदणीकृत कंपन्यांचे बाजार भांडवल पाच ट्रिलियन डॉलर्सपुढे
भारतीय नोंदणीकृत कंपन्यांचे एनएसईवरील बाजार भांडवल २३ मे २०२४ रोजी पाच ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे (४१६.५७ ट्रिलियन रुपये) गेले आहे. याच दिवशी निफ्टी ५० इंडेक्स सर्वाधिक म्हणजे २२,९९३.६० च्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी ५०० इंडेक्सही आज २१,५०५.२५ च्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला असून ते इक्विटी बाजारपेठेतील विकास फक्त मोठ्या आणि भांडवली स्टॉक्सपुरता मर्यादित राहिला नसल्याचे निदर्शक आहे.भारतीय नोंदणीकृत कंपन्यांच्या २ ट्रिलियन डॉलर्स (जुलै २०१७) ते ३ ट्रिलियन डॉलर्सपर्यंतच्या (मे २०२१) प्रवासाला ४६ महिने लागले.
३ ट्रिलियन डॉलर्स ते ४ ट्रिलियन डॉलर्स (डिसेंबर २०२३) प्रवासाला ३० महिने लागले, तर नुकत्याच पूर्ण झालेल्या १ ट्रिलियनच्या प्रवासाला सहा महिने लागले. बाजार भांडवलानुसार पहिल्या पाच कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेज, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, एचडीएफसी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक लिमिटेड आणि भारती एयरटेल लिमिटेड यांचा समावेश आहे.
गेल्या १० वर्षांत निफ्टी ५० इंडेक्सने १३.४ टक्के परतावे (एकूण किंमत निर्देशांक सीएजीआर) दिले. याच कालावधीत देशांतर्गत म्युच्युअल फंड अॅसेट्स अंडर मॅनेजमेंट (इक्विटी आणि डेट) एप्रिल २०१४ मधील ९.४५ ट्रिलियन रुपयांवरून ५०६ टक्क्यांनी वाढून एप्रिल २०२४ पर्यंत ५७.२६ ट्रिलियन रुपयांपर्यंत वाढले. फॉरिन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स (एफपीआ) अॅसेट्स अंडर मॅनेजमेंट (इक्विटी आणि डेट) एप्रिल २०१४ मधील १६.१ ट्रिलियन रुपयांवरून ३४५ टक्क्यांनी वाढून एप्रिल २०२४ च्या अखेरपर्यंत ७१.६ ट्रिलियन रुपयांवर गेले आहे.
बाजार भांडवलातील वाढ केवळ आघाडीच्या कंपन्यांपुरती मर्यादित नाही, तर ती विविध स्टॉक्समध्ये मोजली जाते. निफ्टी १०० च्या घटकांचा बाजारभांडवलातील सध्याचा वाटा ६१ टक्के असून २०१४ मध्ये तो एकूण बाजार भांडवलाच्या ७४.९ टक्के होता. प्राथमिक बाजारपेठेतील लघु व मध्यम उद्योगांसह कॉर्पोरेट्सद्वारे एकत्रित केले जात असलेले स्त्रोत उत्साहवर्धक आहेत. त्यांच्यामुळे निधी उभारणीच्या पारंपरिक पद्धतींशिवाय प्रभावी पर्यायी यंत्रणा पुरवली जात आहे.
माध्यमिक बाजारपेठेतील लिक्विडिटीसुद्धा भांडवली बाजारपेठेत लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. इक्विटी क्षेत्राची दैनंदिन सरासरी उलाढाल आर्थिक वर्ष २०१५ मधील १७,८१८ कोटी रुपयांवरून ४.५ पटींनी वाढून आर्थिक वर्ष २४ मध्ये ८१,७२१ कोटी रुपयांवर गेली आहे.
ही कामगिरी अमृत काळासाठी तयार करण्यात आलेल्या व्हिजनचे प्रतीक असून त्यामध्ये तंत्रज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था, दमदार सार्वजनिक अर्थकारणासह ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था आणि मजबूत आर्थिक क्षेत्र यांचा समावेश आहे.
एक्सचेंजने नुकते निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्सवर डेरिव्हेटिव्हज लाँच केले आहेत. या लाँचसह एक्सचेंजने ३ ब्रॉड मार्केट इंडायसेसवर डेरिव्हेटिव्हज लाँच केले आहेत. त्यामध्ये निफ्टी ५० इंडेक्स, निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्स आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट इंडेक्सचा समावेश आहे. त्यातून बाजारपेठेतील मोठ्या आणि लिक्विड मध्यम भांडवली क्षेत्राला योग्य प्रतिनिधीत्व मिळवून देण्यात आले आहे.
एनएसईचे प्रमुख व्यवसाय अधिकारी श्री श्रीराम कृष्णन म्हणाले, ‘मी भारत सरकार, सिक्युरिटीज एक्सचेंज ऑफ बोर्ड ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे भांडवली बाजारासाठी प्रगतीशील नियामक चौकट पुरवल्याबद्दल आभार मानतो. त्याचबरोबर नोंदणीकृत कंपन्या, ट्रेडिंग सदस्य, गुंतवणूकदार आणि इतर भागधारकांचे हा महत्त्वाचा टप्पा साध्य केल्याबद्दल मी अभिनंदन करतो.’
केवळ सहा महिन्यांच्या काळात बाजार भांडवलात नुकत्याच झालेल्या १ ट्रिलियन डॉलर्सच्या अतिरिक्त वाढीमुळे येत्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेवरील गुंतवणुकदारांचा विश्वास आणखी दृढ होणार आहे. एनएसई एक बाजार पायाभूत संस्था या नात्याने विकास करत राहील आणि सर्वोत्तम बाजार पायाभूत सुविधा पुरवेल. त्याचप्रमाणे एनएसईद्वारे गुंतवणुकदारांना, वितरकांना स्त्रोत एकत्रित करण्यासाठी व पर्यायाने देशातील भांडवल उभारणीसाठी आवश्यक व्यासपीठ आणि पाठिंबा दिला जाईल.