no images were found
एक महत्वाचे समीकरण : शिवसेनेची संभाजी ब्रिगेडशी युती
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते. दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक समन्वय समिती देखील नेमण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली.
फक्त महाराष्ट्रातच नाही तर प्रादेशिक पक्ष चिरडून टाकणं यालाच लोकशाही मानणारे लोकं बेताल वागत आहेत. येत्या काही काळात सुप्रीम कोर्टात जो लढा सुरु आहे, हा केवळ शिवसेनेच्या भवितव्याचाच आहे असे नाही. देशात लोकशाही असेल का बेबंदशाही, याचा निकाल लागणार आहे. पण आपण संविधान वाचवण्यासाठी, प्रादेशिक अस्मिता टिकावण्यासाठी एकत्र यायला हवे. आपण सगळे शिवप्रेमी असून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ आपण सगळे एकच आहोत. मराठी माणसाला दुहीचा शाप गाढत आलाय. या शापालाच आपण गाढून टाकूया. शिवसेना सत्तेत नसताना संभाजी ब्रिगेड आज आमच्यासोबत आले, याचा मोठा आनंद आहे, सत्तेत असताना तर कुणीही साथ देऊ शकतात, मात्र शिवसेना आज संघर्ष करत असताना सोबत आले ते खरे लढवय्ये, तेच खरं शौर्य. या लढवय्या सहकाऱ्यांचं स्वागत करतोय. असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढले.
दरम्यान ही लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन अशा पक्षांशी आघाडी करून भविष्यात नवी वाटचाल सुरु करावी, असं आम्ही विविध संघटनांना आवाहन केलंय, भविष्यात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एक युती म्हणून काम करेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकीत आम्ही एकत्रपणे लढू, असं इथे जाहीर करतो असे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे म्हणाले.