
no images were found
मणिपूरप्रकरणी संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
भारताच्या इशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये जवळपास तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. परंतु, अनेकांना तिथल्या घटनांचं गांभीर्य नव्हतं. अशातच, चार दिवसांपूर्वी मणिपूरमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये तिथल्या कुकी समुदायाच्या दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढल्याचे आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांना ठार मारल्याचं सांगण्यात येत आहे. बुधवारी संध्याकाळी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर देशभरातून यावर तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर तिथल्या पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे लोकांमधून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या. लोकांच्या संतापानंतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई सुरू केली. परंतु त्यास तब्बल दोन महिने उशीर झाला. तसेच केंद्र सरकार आणि मणिपूर सरकारने याप्रकरणी योग्य पावलं उचलली नाहीत, असाही आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मणिपूरधील घटनेवरून थेट केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. खासदार राऊत म्हणाले, संपूर्ण देश आणि विश्वासमोर ‘मणिपूर फाईल्स’ ओपन झाल्या आहेत. लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. ही केवळ एक घटना समोर आली आहे. परंतु तिथे अशा कित्येक घटना घडल्या आहेत.