
no images were found
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नरवीर शिवा काशीद आणि बाजीप्रभु देशपांडे यांना अभिवादन !
पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर) – छत्रपती शिवाजी महाराज यांना विशाळगडावर सुखरूप पोचवण्यासाठी बलिदान देणारे नरवीर शिवा काशीद आणि बाजीप्रभु देशपांडे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. प्रथम पन्हाळा येथे नरवीर काशीद यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करण्यात आला. येथे वीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद यांनी ध्येयमंत्र, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अभिषेकमंत्र आणि प्रेरणामंत्र म्हटले. यानंतर पावनखिंड येथे बाजीप्रभू देशपांडे आणि अन्य मावळे यांचे स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते हिंदु जनजागृती समितीच्या माहितीपर फलकाचे अनावरण करण्यात आले आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेण्यात आली.
सध्याच्या काळात हिंदू म्हणून संघटित होणे आवश्यक ! – आनंदराव काशीद
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व स्तरांतील लोकांना संघटित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यासाठी नरवीर शिवा काशीद आणि बाजीप्रभु देशपांडे यांच्यासारख्या अनेकांनी बलिदान दिले. हे बलिदान स्वराज्यासाठी होते. आजच्या काळात आपण हिंदू परत एकदा विभागलो गेलो असून धर्मावर होणार्या आघातांच्या विरोधात ‘हिंदू’ म्हणून संघटित होणे आवश्यक आहे, असे आवाहन श्री. आनंदराव काशीद यांनी या प्रसंगी केले.
या वेळी भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे, श्री. रमेश पडवळ, हिंदुत्वनिष्ठ व्यावसायिक श्री. चारुदत्त पोतदार, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, श्री. शिवानंद स्वामी यांसह हुपरी येथील तरुण उपस्थित होते.