
no images were found
शिवसेना भवनासमोर एका महाराष्ट्रसैनिकाने बॅनरबाजी ; राज-उद्धव आता तरी एकत्र या
मुंबई – मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनासमोर एका महाराष्ट्रसैनिकाने बॅनरबाजी केली आहे. या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
२०१९ नंतर राज्याच्या राजकारणात सत्तापरिवर्तन झाले. भाजपा-शिवसेना यांनी युतीत निवडणुका लढवल्या त्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने भाजपाशी काडीमोड घेत थेट विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी स्थापन झाली. मात्र त्यानंतर अडीच वर्षात शिवसेनेत फूट पडली. शिवसेनेचे ४० आमदार भाजपासोबत आले. त्यानंतर महाविकास सरकार कोसळले. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. आता वर्षभरानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवारांसह ९ जणांनी बंड पुकारात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले.
मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनासमोर एका महाराष्ट्रसैनिकाने बॅनरबाजी केली आहे .महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला असून राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे असं आवाहन या बॅनरमधून केले आहे. दादर परिसरातील लक्ष्मण पाटील या कार्यकर्त्याने हा बॅनर लावला आहे. त्यावर लिहिलंय की, महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला, राजसाहेब-उद्धवसाहेब आता तरी एकत्र या, संपूर्ण महाराष्ट्र आपली वाट पाहतोय. एका महाराष्ट्रसैनिकाची हात जोडून कळकळीची विनंती असा मजकूर छापण्यात आला आहे.