no images were found
सांगलीची मुलगी सांभाळणार कॅनडाची अन्नसुरक्षा
सांगली : कॅनडा देशानं आपल्याला व्हिसा नाकारल्याची खंत मेघा यांच्या मनात होती. ती सल दूर करण्यासाठी त्यांनी खासगी नोकरीवर समाधान न मानता पुढील धडपड सुरू केली. तेथील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करुन फूड इन्स्पेक्टरची परीक्षा दिली. त्या परीक्षेत त्यांना यश मिळाले. मेघा 5 जून रोजी कॅनडामध्ये अन्न सुरक्षा निरीक्षकपदी रुजू झाल्या आहेत.
सांगली जिल्ह्यातील रामानंदनगर (ता.पलूस) येथील विजय वाईंगडे यांना दोन मुलं. त्यामध्ये मेघा मोठी. त्यांना एक लहान भाऊ आहे. मेघा यांचे बारावीपर्यंतचं शिक्षण किर्लोस्कर विद्यालयात झालं. त्यांनी कोल्हापूर येथील सायबर कॉलेजमध्ये फूड टेक्नॉलजीची पदवी घेतली. पुण्यातील एका लॅबोरेटरीमध्ये सहा महिने अन्न नमुन्याच्या तपासणीचे प्रशिक्षण घेतले.
मेघा यांचे लग्न कोल्हापूरच्या रोहन शिंदे यांच्याशी झाले. त्यावेळी रोहन मुंबईतील एका कंपनीत काम करत होते. लग्नानंतर मेघा मुंबईत घराजवळच्या एका जिममध्ये आहार तज्ज्ञ म्हणून काम करत होत्या.
रोहन यांना कॅनडा देशात एका अॅनिमेशन कंपनीमध्ये नोकरी मिळाली. रोहन यांनी मेघाला तिचे पुढचे शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला आणि मेघाने दोन वर्षाचे एमएसस्सी शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले. त्यानंतर जेव्हा कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा मेघाचा व्हिसा तेथील सरकारने नाकारला. या दरम्यान मेघा कॅनडामधील भाषा शिकत, कॅनडा येथील नोकरीच्या शोधात होती. तब्बल एक वर्षाच्या प्रयत्नांनी तिला एका कंपनीत नोकरी मिळाली आणि वर्क परमिट ही मिळाले.
कॅनडा सरकारच्या या खात्यात रुजू होणारी मेघा ही सांगली जिल्ह्यातील पहिलीच महिला असावी. फूड टेक्नॉलजी हा कोर्स करूनही परदेशात उच्च पद मिळू शकते हे त्यांनी दाखवून दिलंय. संधी मिळाली तर ग्रामीण भागातील मुलगी केवळ मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर किती मोठी झेप घेऊ शकते, याचं मेघा या उदाहरण आहेत