Home Uncategorized सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज

सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज

1 min read
0
0
10

no images were found

सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज –आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडून विसर्जन मार्ग व इराणी खणीची पाहणी

 कोल्हापूर, : अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. विसर्जन मार्ग तसेच विसर्जन स्थळावरील तयारीची आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी कसबा बावडा येथील राजाराम बंधारा, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळा व इराणी खण परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

            पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार विसर्जन मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेट्स, वॉच टॉवर व प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन मार्गावरील धोकादायक सहा इमारतींच्या परिसरात बॅरिकेट्स उभारून सूचना फलक लावण्यात आले आहेत. यामध्ये महाद्वार रोडवरील पाच व गंगावेश येथील एका इमारतीचा समावेश आहे. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने या इमारतींमध्ये प्रवेश करू नये तसेच इमारतींच्या खाली उभे राहू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

            यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, सहा.आयुक्त संजय सनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता सुरेश पाटील, मिलिंद जाधव, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबंरे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, सहा.अभियंता विद्युत नारायण पुजारी, कनिष्ठ अभियंता अमीत दळवी, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला आदी उपस्थित होते.

            सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मार्गावरील खड्ड्यांवर युद्धपातळीवर डांबरी पॅचवर्क पूर्ण करण्यात आले आहे. मिरवणूक मार्गावरील अडथळे व अतिक्रमणे काढण्यात आली असून, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. इराणी खण तसेच विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे.

मिरजकर तिकटी ते गंगावेश मार्गावर सात सिग्नल यंत्रणा

            महापालिकेच्यावतीने मिरजकर तिकटी ते पापाची तिकटी ते गंगावेश चौक या मार्गावर सात ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच या मार्गावर अतिरिक्त प्रकाश व्यवस्थेसाठी हेरिटेज खांबांवर २०० वॅट क्षमतेचे ३० फ्लड लाईट बसविण्यात आले आहेत.

इराणी खणीवर चार क्रेन, दहा फ्लोटिंग तराफे

            सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी इराणी खणीवर चार क्रेन व दहा फ्लोटिंग तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनाच्या कामकाजासाठी पवडी, आरोग्य, उद्यान तसेच अन्य विभागांतील सुमारे तीन हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासोबतच १०० टेंपो, ४०० हमाल, पाच जेसीबी, सात डंपर, चार पाणी टँकर, दोन बूम, सहा ॲम्बुलन्स तसेच आवश्यक इतर यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. विसर्जन मार्ग व विसर्जन स्थळांवर स्वच्छता राखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले असून, वैद्यकीय पथकेही तैनात करण्यात येणार आहेत.

            गणेशमूर्ती तसेच निर्माल्य संकलित करून ते इराणी खणीपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फतही निर्माल्य संकलन करण्यात येणार असून, सुमारे ६०० सेवक या कामासाठी उपस्थित राहणार आहेत. संकलित निर्माल्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे.

विसर्जन मिरवणुकीतील मंडळांच्या अध्यक्षांचे श्रीफळ व रोप देऊन स्वागत

            शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशीनिमित्त विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, तरुण मंडळे व तालीम संस्थांच्या अध्यक्षांचे महापालिकेच्यावतीने स्वागत करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने स्वागत कक्ष उभारण्यात येणार असून, पर्यायी विसर्जन मार्गावरील हॉकी स्टेडियम येथेही स्वागत कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी सहभागी मंडळांच्या अध्यक्षांना महापालिकेच्यावतीने श्रीफळ, पान-सुपारी तसेच एक रोप देऊन स्वागत करण्यात येणार आहे.

अग्निशमन दलाचे पथक व सुरक्षा रक्षक तैनात

            अग्निशमन विभागामार्फत विसर्जन स्थळी अग्निशमन दलाचे पथक तसेच सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. विसर्जनाच्या दिवशी नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता व पर्यावरण संवर्धन यास प्राधान्य देण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करून शिस्तबद्ध व सुरक्षित पद्धतीने विसर्जन मिरवणूक पार पाडावी. तसेच पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे विसर्जन इराणी खणीमध्येच करावे, असे आवाहन महापौर सौ. रुपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

बाबूजींचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचं नातं; भरभरुन प्रेम दिल्याबद्दल कोल्हापूरकरांना धन्यवाद ! – ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके

बाबूजींचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचं नातं; भरभरुन प्रेम दिल्याबद्दल कोल्हापूरकरांना धन्यवाद …