no images were found
शिरोळ तालुक्यातील पाणी टंचाईवर उपाययोजना करा – आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील विशेषतः दत्तवाड, जुने दानवाड नवे दानवाड, घोसरवाड व हेरवाड या गावांमधील पाणीटंचाईची भीषणता निदर्शनास आणून या भागामध्ये पाणी देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात व सांगली येथील राजापूर कृष्णा नदीवरील बंधा-यातील पाणी पातळी आवश्यक इतकी ठेवून शिरोळ तालुक्यातील अन्य गावांना टंचाईपासून वाचविण्याच्या सूचना आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रशासनाला केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात दूधगंगा धरणाच्या लाभक्षेत्रातील शिरोळ तालुक्यातील गावांतील पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठीच्या टंचाईबाबत माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली.
शिरोळ तालुक्यातील काही गावांमधील पाणीटंचाईची भीषणता आमदार श्री. यड्रावकर यांनी निदर्शनास आणून दिली. या वर्षीच्या हंगामी पावसाने ओढ दिली आहे व उन्हाळी हंगामात अवकाळी पाऊस पडलेला नाही. यामुळे दूधगंगा खो-यात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने या प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरांनी यांनी केली.
सध्या दूधगंगा नदीपात्र कर्नाटक सीमेलगतच्या भागात पुर्णतः कोरडे पडले आहे. दूधगंगा धरणातील विसर्ग हा जेमतेम असल्याने सुळकूड बंधा-यापर्यंत पाणी उपलब्ध होत आहे. या बंधाऱ्यांच्या अधोबाजूस कर्नाटक राज्याचे बंधारे आहेत व त्याच्याखाली दत्तवाड हा महाराष्ट्र राज्यातील बंधारा आहे. सध्या या बंधा-यामध्ये अत्यल्प प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. तसेच कृष्णा नदीवरील कल्लोळ बंधा-याचे नुतनीकरण व बांधकाम चालू असल्याने या मार्गाने या गावांना पाणी उपलब्ध करता येत नाही.
दूधगंगा धरणात सध्या फक्त मृत पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच वेदगंगा नदीवरील पाटगांव धरणामध्ये सुध्दा अत्यल्प पाणी शिल्लक आहे. दूधगंगा धरणातून पूर्ण विसर्ग क्षमतेने पाणी सोडून ७० ते ७५ कि.मी. लांबीपर्यंत पाणी पोहचविणे सद्यस्थितीत शक्य नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
सीमा भागातील पाणी नियोजनाबाबत बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांसोबत दूरध्वनीवरुन चर्चा
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तातडीने बेळगाव जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली व कर्नाटक राज्यातील गावात शेतीसाठी उपसाबंदी लागू करून नदीतील उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याबाबत सकारात्मक चर्चा केली व शिरोळ तालुक्यातील टंचाईग्रस्त गावामध्ये तातडीने पिण्याचे पाण्याचे टँकर सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी प्रांताधिकारी यांना सूचना दिल्या.