
no images were found
शेतकऱ्यांनी ई-केवायसी व आधार जोडणी पूर्ण करुन घ्यावी -जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
कोल्हापूर : प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 4 लाख 60 हजार 213 शेतकऱ्यांपैकी 4 लाख 53 हजार 793 शेतकऱ्यांनी बँक खाते आधारला संलग्न केले आहे. या योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित राहू नयेत, यासाठी दि. 20 व 21 जून रोजी प्रत्येक गावात ई-केवायसी व आधार जोडणी मोहिम नियोजित करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करुन शेतकऱ्यांनी ई-केवायसी व आधार जोडणी पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी केले आहे.
मृत शेतकरी, आयकरधारक शेतकरी, शेती नाही मात्र तरीही नोंदणी, बाहेरगावी वास्तव्य अशा विविध कारणांमुळे बँकेतील खात्याला आधार कार्ड संलग्न करणे, केवायसी करण्यास व प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेंतर्गत 14 वा हप्ता वितरित करण्यास अडचणी येत आहेत. जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेंतर्गत एप्रिल ते जुलै 2023 अखेर 14 व्या हप्त्याचा लाभ वितरित करण्याची कार्यवाही केंद्र शासनामार्फत सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी केंद्र शासनाने ई-केवायसी आणि बँक खाते आधार संलग्न करणे बंधनकारक केले आहे. जे लाभार्थी पी. एम. किसानसाठी ई-केवायसी किंवा बँक खाते आधार संलग्न करणार नाहीत, त्यांना 14 वा हप्ता मिळणार नाही. तसेच राज्य शासनाच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधीचा फायदाही उपलब्ध होणार नाही. जिल्ह्यातील 4 लाख 60 हजार 213 शेतकऱ्यांपैकी 4 लाख 53 हजार 793 शेतकऱ्यांनी बँक खाते आधारला संलग्न केले आहे. मात्र अद्याप 6 हजार 420 शेतकऱ्यांचे बँक खाते आधारला संलग्न झालेले नाही. तसेच जिल्ह्यातील 4 लाख 60 हजार 213 शेतकऱ्यांपैकी 3 लाख 74 हजार 613 शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली असून अद्याप 85 हजार 600 शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही.
तालुका निहाय एकूण शेतकऱ्यांची संख्या व कंसात ई-केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे. आजरा – 28 हजार 339 (4 हजार 874), भुदरगड – 30 हजार 356 (5 हजार 164), चंदगड – 38 हजार 650 (5 हजार 527), गडहिंग्लज – 47 हजार 21 (7 हजार 366), गगनबावडा – 6 हजार 746 (1 हजार 327), हातकणंगले – 47 हजार 871 (10 हजार 888), कागल – 44 हजार 38 (5 हजार 827), करवीर – 59 हजार 767 (11 हजार 848), पन्हाळा – 45 हजार 145 (8 हजार 766), राधानगरी – 37 हजार 20 (7 हजार 348), शाहुवाडी – 31 हजार 670 (6 हजार 941) व शिरोळ – 43 हजार 590 (9 हजार 724).