no images were found
शेवगावची दंगल प्रकरणी कोर्ट जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य – प्रकाश आंबेडकर
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती मिरवणुकीदरम्यान शेवगावमध्ये घडलेली दंगल म्हणजे विरोधकांवर राजकीय दुश्मनी काढण्याचा प्रकार आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी केला.
शेवगावमध्ये दंगल घडली तेव्हा ‘वंचित’चे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण हे छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमास उपस्थित होते. त्यामुळे त्यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही, असे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
शेवगाव येथील दंगलप्रकरणी राजकीय विरोधकांची नावे जाणीवपूर्वक गोवली आहेत. या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. यावेळी ऍड. दीपक श्यामदिरे, चव्हाण, प्रा. विष्णू जाधव, प्रभाकर बकले, डॉ. नितीन सोनवणे आदी उपस्थित होते.
अशा घटनांमधून राजकीय दुश्मनी काढण्याचा प्रयत्न होतो आहे. या घटनेत जे लोक सहभागी होते, त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करावी. मात्र, निरपराध व्यक्तींना राजकीय आकसापोटी गुह्यात अडकवू नये. जेणेकरून तरुण कार्यकर्त्यांचे भवितव्य धोक्यात येणार नाही, याचा विचार केला पाहिजे. अशा घटना जाणीवपूर्वक घडविल्या जातात. निवडणुका जवळ आल्यानंतर अशा घटनांचे प्रमाण वाढते, असा अनुभव आहे, असेही ते म्हणाले.
प्रा. किसन चव्हाण यांच्या अटकपूर्व जामिनाबाबत अद्यापि निर्णय झालेला नाही. पोलिसांच्या वतीने अटकपूर्व जामीन अर्जावर आपले म्हणणे कोर्टात दाखल करावे, त्यानंतर कोर्ट जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल, असेही आंबेडकर यांनी सांगितले.