
no images were found
महाराष्ट्र धर्म विकसित होण्यासाठी विचारवंतांचे योगदान : डॉ.चौसाळकर
कोल्हापूर : महाराष्ट्र धर्म ही संकल्पना विकासित होण्यामध्ये संत व महानुभाव पंथांची भूमिका महत्वाची आहे.महाराष्ट्र राज्य निर्माण करणे हेच महाराष्ट्र धर्माचा उद्देश होता. महाराष्ट्र धर्म विकासित होण्यासाठी संतमहानुभावापासून छत्रपती शिवाजी महाराज,टिळक,लोकहितवादी,वि.का.राजवाडे, न्यायमूर्ती रानडे, राजाराम शास्त्री भागवत इ.विचारवंतानी योगदान दिले आहे,असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत प्रा.डॉ.अशोक चौसाळकर यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या राज्यशास्त्र विषया अंतर्गत ‘महाराष्ट्राची संकल्पना आणि लघु संशोधन प्रबंध सुलभ लेखन पद्धती’ या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेच्या “महाराष्ट्र धर्म”या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपकुलसचिव डॉ.संजय कुबलहोते.यावेळी उपकुलसचिव श्री.सी.एस.कोतमिरे यासह विद्यार्थी,समन्वयक,सहा.प्राध्यापक प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी
व सेवक उपस्थित होते.
प्रा.डॉ.चौसाळकर म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठीमध्ये राज्य व्यवहारकोष तयार करण्यात आले.स्वतंत्र पूर्व काळात मराठी भाषिक लोक हे मुंबई,मध्य प्रांत व बेरार व हैद्राबाद संस्थान या तीन प्रांतामध्ये विभागलेला होता.तिन्ही भागातील मराठी भाषिक लोकांना एकत्रित करून मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली मुंबई महाराष्ट्राला देण्यासाठी केंद्रातील नेते उत्सुक नव्हते. परंतु जन आंदोलनापुढे केंद्र सरकार नमती भूमिका घेतली व १९६० साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.त्यासाठी १०५ लोकांना आपला जीव गमवावा लागला ते महाराष्ट्र धर्मासाठी हुतात्मा झाले. प्रास्ताविक व स्वागत डॉ.एस.डी.भोसले यांनी केले.पाहुण्यांचा परिचय डॉ.एम.एम.मुजावर यांनी केले. आभार सातारा विभागीय केंद्राचे समन्वयक डॉ.एस.एल.गायकवाड यांनी केले.