no images were found
शासन आपल्या दारी अभियान यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करावे – भगवान कांबळे
कोल्हापूर :-राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. याच अनुषंगाने संभाव्य दिनांक 4 जून 2023 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात मा. मुख्यमंत्री व मा. उप मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या अभियान अंतर्गत कार्यक्रम नियोजित असून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे व आपल्या विभागाअंतर्गत असलेल्या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात शासन आपल्या दारी अभियान पूर्वतयारी अंतर्गत आढावा बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कांबळे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, करवीर तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्यासह अन्य विभागाचे विभाग प्रमुख तथा प्रतिनिधी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कांबळे पुढे म्हणाले की, यापूर्वी झालेल्या बैठकीत मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व संबंधित विभागाने ग्रामस्तरापर्यंत जाऊन आपल्या विभागाच्यावतीने सर्वेक्षण करून पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांच्या याद्या तयार केलेल्या आहेत. त्याप्रमाणे संबंधित लाभार्थ्याला शंभर टक्के लाभ मिळेल याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.संभाव्य 4 जून रोजी होणाऱ्या शासन आपल्या दारी या अभियानासाठी मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असून विविध शासकीय योजनांसाठी पात्र ठरलेल्या संबंधित लाभार्थ्याला मान्यवरांच्या हस्ते लाभ देण्यात येणार आहे. या अनुषंगाने सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी स्वतः लक्ष घालून लाभार्थ्याची खात्रीशीरपणे निवड करावी व कार्यक्रमाच्या ठिकाणी संबंधित लाभार्थी उपस्थित राहून योजनेचा लाभ स्वीकारेल याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सूचित केले.