no images were found
करवीरनगरीत हिंदुत्वाचा जागर !
कोल्हापूर – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या 81 व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने देशभरात ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे. त्या निमित्ताने साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या आणि श्री महालक्ष्मी देवीच्या कृपेने पावन झालेल्या करवीर नगरीत 29 मे 2023 या दिवशी हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले गेले. या फेरीत वारकरी संप्रदाय, श्री संप्रदाय, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, ‘इस्कॉन’, भजनी मंडळ, भाजप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट) पतित पावन संघटना, कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघ यांसह विविध संप्रदाय यांसह मोठ्या संख्येने हिंदू सहभागी होते. या फेरीसाठी सनातन संस्थेचे संत पू. सदाशिव(भाऊ) परब, तसेच पू. (डॉ.) श्रीमती शरदिनी कोरे यांची वंदनीय उपस्थित होती.
हिंदू एकता दिंडीला मिरजकर तिकटी येथे भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ यांच्या हस्ते धर्मध्वजपूजनाने प्रारंभ झाला. या प्रसंगी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या पालखीचे पूजन श्री. उदयसिंह देसाई आणि सौ. ऐश्वर्या देसाई यांनी, तर श्री महालक्ष्मी देवीच्या पालखीचे पूजन धर्मप्रेमी श्री. प्रदीप नलावडे आणि सौ. शीतल नलावडे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे पूजन शिवसेनेचे श्री. उदय भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे यांनी दिंडीचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर दिंडी मार्गस्थ झाली. मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे दिंडीची सांगता झाली. दिंडीच्या समोर धर्मध्वज होता, तर मागे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र, श्री महालक्ष्मी देवी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती असलेली पालखी होती. दिंडी जात असतांना वाटेत धर्मध्वजाची आरती ओवाळून, तसेच पुष्पवृष्टी करून अनेकांनी स्वागत केले.
दिंडीच्या समारोपप्रसंगी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी श्री. किरण दुसे म्हणाले, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी त्यांच्या गुरूंच्या आशीर्वादाने अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू केले. सत्संग, बालसंस्कारवर्ग, धर्मशिक्षणवर्ग, ग्रंथलेखन आदी माध्यमातून अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू असतानाच त्यांनी राष्ट्ररक्षण,धर्मजागृती आणि समाजसाहाय्य या त्रिसूत्रीच्या आधारेही कार्य आरंभले. पुढे कालानुरूप धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राचा उद्घोष केला. कलियुगात जलद अध्यात्मिक उन्नती करून देणार्या ‘गुरुकृपायोग’ या योगमार्गाची त्यांनी निर्मिती केली आणि व्यष्टी साधनेसह समष्टी साधनेचाही पुरस्कार केला.’’
यावेळी वंदे मातरम् युथ ऑर्गनायझेशनचे श्री. अवधुत भाट्ये, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, श्री. उदय भोसले, धर्मप्रेमी श्री. रामभाऊ मेथे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, ह.भ.प. महादेव रामचंद्र यादव महाराज, अधिवक्ता श्री. संजय पाटील, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. शाम जोशी, मलकापूर येथील श्री. रमेश पडवळ, केर्ली येथील शिवसेनेचे श्री. भिमराव पाटील, शिवसेनेचे श्री. दुर्गेश लिंग्रज, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख श्री. संभाजीराव भोकरे (उद्धव ठाकरे गट) इ. मान्यवर उपस्थित होते