no images were found
वादळी वाऱ्याने झाडे कोसळली; सांगली-कोल्हापूर महामार्ग चार तास ठप्प
वादळी वारे आणि रिमझिमता पाऊस याच्या फटका बसल्याने झाडे उन्मळून पडल्याने कोल्हापूर – सांगली महामार्गावरील वाहतूक सायंकाळी ठप्प झाली होती. उदगाव (ता. शिरोळ) ते अंकली (तामिरज) यादरम्यान असलेल्या कृष्णा नदीच्या अंकलीकडील पुलावर वाहने चार तासाहून अधिक काळ खोळंबून राहिल्याने वाहनधारक, प्रवाशांची कोंडी झाली. सायंकाळी साडेसहा नंतर वाहतूक पूर्वपदावर आली.
घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पो. कॉ. सचिन चौगुले, कांशीराम कांबळे, वैभव सूर्यवंशी, गुलाब सनदी, किजय मगदूम, विशाल खाडे यांच्यासह इतर दाखल होऊन तत्काळ पडलेली झाडे बाजूला करण्यात आली. त्यानंतर पाचच्या सुमारास जयसिंगपूर पोलिसांनी वाहतूक सोडण्यास सुरुवात केल्यानंतर तब्बल दोन तास वाहतूककोंडी निघाली नव्हती. त्यामुळे मिरजकडे जाणारी वाहने उदगाव-चिंचवाड-अर्जुनवाडमार्गे सोडण्यात आली.
या वाहतूककोंडीमुळे कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. तर यात मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, विजापूर यांसह इतर 100हून अधिक एसटी बसेस अडकून पडल्या होत्या. शिवाय रुग्ण नेणारी रुग्णवाहिका अडकून पडल्याने पोलिसांनी अनेक प्रयत्न करून रुग्णवाहिका रवाना केली.