no images were found
बुद्ध पौर्णिमेच्या रात्री निसर्गप्रेमींनी घेतला ‘निसर्गानुभव”
कोल्हापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून बुद्ध पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या “निसर्गानुभव कार्यक्रम- 2023 अंतर्गत पार पडलेल्या मचाणावरील वन्य प्राणी गणनेत निसर्गप्रेमींना एकुण 374 वन्यप्राण्यांचे दर्शन घडल्याची माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालकांनी दिली आहे.
बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘निसर्गानुभव कार्यक्रम -2023 अंतर्गत निवडण्यात आलेल्या 60 निसर्गप्रेमींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोयना, बामणोली, चांदोली, ढेबेवाडी आणि हेळवाक या वन परिक्षेत्रांतील जंगलातील 60 मचाणांवर बसून अरण्य वाचनाचा थरारक अनुभव घेण्याची संधी मिळाली. वन्यप्राणी गणनेत बिबट्यासह एकुण 18 सस्तन वन्य प्राणी प्रजातींचे तसेच 10 वन्य पक्षी प्रजातींचे दर्शन निसर्गप्रेमींना घडले.
निसर्गानुभव कार्यक्रम 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी याबरोबरच नाशिक, पुणे, मुंबई येथूनही निसर्गप्रेमींनी हजेरी लावली होती. निसर्गप्रेमींकडून भरुन घेण्यात आलेल्या अभिप्रायांनुसार गणनेसाठी सहभागी झालेल्या निसर्गप्रेमींनी निसर्गानुभव कार्यक्रम व त्याकरिता दिलेल्या सोयीसुविधांबाबत आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे सर्व मचाणांवर वन्यप्राण्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दर्शन घडले आहे. मचाणावर निसर्गप्रेमींना गणनेची माहिती भरण्याकरीता प्रपत्र देण्यात आले. रात्रभर जागे राहून पानवठ्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या प्राण्यांची नोंद निसर्गप्रेमींकडून करण्यात आली. नोंदीनुसार त्यांना 60 मचाणांवर एकुण 374 वन्यप्राण्यांचे दर्शन घडले. मागील वर्षी 54 मचाणांवर एकूण 308 वन्य प्राण्यांची नोंद करण्यात आली होती.
सामान्य नागरिकांना त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून त्यांना निसर्गाची अनुभूती घेता यावी. रात्रीचे जंगल, वन्य प्राण्यांचे आवाज, निशाचर प्राण्यांची वर्तणुक इत्यादी रंजक माहिती मिळावी या उद्देशाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातर्फे “निसर्गानुभव कार्यक्रम – 2023” राबविण्यात आला होता.