
no images were found
धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी वसतीगृह निर्वाह भत्याचा लाभ घ्यावा
कोल्हापूर : राज्यातील मान्यताप्राप्त शासकीय, अनुदानित आणि कायम विना अनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतनमध्ये शासनाने निर्धारित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेव्दारे प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांकरीता, वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी स्वतंत्र वसतिगृह निर्वाह भत्ता योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेतंर्गत पात्र विदयार्थ्यांस भोजन भत्ता 25 हजार रु., निवास भत्ता 12 हजार रु., निर्वाह भत्ता 6 हजार रु. असे एकूण 43 हजार अनुज्ञेय राहणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष खालीलप्रमाणे – विद्यार्थी धनगर समाजातील असावा. जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था, महाविद्यालये ज्या शहराच्या ठिकाणी आहेत अशा शहरातील विद्यार्थी रहिवासी नसावा. विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशित असावा. इयत्ता 12 वी मध्ये किमान 60 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी पात्र राहतील. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांस अदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा.
योजनेतंर्गत लाभ देण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली असून धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी या योजनेतंर्गत लाभ घेण्याकरीता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कोल्हापूर येथे संपर्क करावा, असे आवाहन श्री विशाल लोंढे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर यांनी केले आहे.