no images were found
संगीत दरबाराच्या माध्यमातून लोकराजाला स्वरांजली
कोल्हापूर: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व स्मृती शताब्दी वर्ष सांगतेनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित, गुणीदास
फाऊंडेशनच्यावतीने शास्त्रीय व सुगम संगीत गायनाचा कार्यक्रम शाहू मिल या ठिकाणी सायं 6 ते 9 या वेळेत संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी , गुणीदास फौंडेशनचे संचालक राजप्रसाद धर्माधिकारी व डॉ अजित शुक्ल यांच्या हस्ते छत्रपती.शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
शाहू महाराजांचे केवळ समाजसुधारणा व शिक्षण या क्षेत्रात योगदान आहे असे नाही , तर नाट्य, गायन आदी कलांना उदार राजाश्रय देऊन त्यांनी कोल्हापूरचे नाव सर्व हिंदुस्थानात मोठे केले. त्यांच्या कारकिर्दीत विविध कला क्षेत्रात एक सुवर्ण युग अवतरले. आज पार पडलेल्या या संगीत दरबारात प्रारंभी डॉ स्नेहा राजुरीकर यांनी राग बिहागडा सादर केला. आशय कुलकर्णी (तबला) स्वरूप दिवाण ( हार्मोनियम ) यांनी साथ केली तर
सहगायन रुद्रनाथ कुलकर्णी यांचे होते .
मन आणि कान तृप्त करणारे शास्त्रीय गायन सादर झाल्यानंतर सुगम संगीत, सायली तळवळकर व सुरंजन खंडाळकर यांनी सादर केले. यावेळी त्यांनी भावगीत, नाटयगीत, अभंग, ठुमरी, गजल आणि भक्ती गीतांनी रसिकांना सांस्कृतिक मेजवानीद्वारे तृप्त केले. हा कार्यक्रम लवकर संपवूच नये अशी भावना येथील खऱ्या कानसेन … दर्दी रसिकांची यावेळी झाली होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी स्वप्निल साळोखे (ॲक्टोपड), विक्रम पाटील ( सिंथेसाईजर ), केदार गुळवणी ( व्हायोलिन ) यांची साथ संगत लाभली. तब्बल अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमाचे तितकेच आशयपूर्ण निवेदन महेश्वरी गोखले यांनी आपल्या स्वच्छ व स्पष्ट आवाजात सादर केले . या कार्यक्रमासाठी गुणीदास फाऊंडेशनचे डॉ. अजित शुक्ल, राजप्रसाद धर्माधिकारी, वासंती टेंबे, सावली केअर सेंटरच्या गौरी देशपांडे यांच्यासह अनेक संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.