no images were found
विद्यापीठात डॉक्युमेंटरी फोटोग्राफी, शॉर्ट फिल्म मेकिंग कोर्सला मान्यता
कोल्हापूर 🙁 प्रतिनिधी )शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेंटरी फोटोग्राफी आणि सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्ट फिल्म मेकिंग हे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यास विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने मान्यता दिली. चालू शैक्षणिक वर्षापासून हे दोन्ही अभ्यासक्रम सुरू होत आहेत. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
अध्यासनात पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाइन जर्नलिझम हा अभ्यासक्रम आधीपासूनच सुरू आहे. डिप्लोमाला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे; मात्र सर्टिफिकेट कोर्ससाठी बारावी पास ही पात्रता निश्चित करण्यात आली आहे. डॉक्युमेंटरी फोटोग्राफी आणि शॉर्ट फिल्म मेकिंग या दोन्ही सर्टिफिकेट कोर्ससाठी वयाची कोणतीही अट नाही. या दोन्हीही अभ्यासक्रमासाठी 8,200 रुपये शुल्क असून दर शनिवार आणि रविवारी या अभ्यासक्रमाचे वर्ग होतील. दोन्ही अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी केवळ 20 जागा आहेत. हे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी विद्यापीठामध्ये स्टुडिओ, कॉम्प्युटर लॅब, डिजिटल क्लासरूम, कॅमेरे, एडिटिंग सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे. अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यासाठी शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी तसेच फोटोग्राफी या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना पाचारण करण्यात येणार आहे. अध्यासनात सुरू असलेल्या डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांनी तसेच या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी नॅनो टेक्नॉलॉजीशेजारी असलेल्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात संपर्क करावा, असे आवाहन अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.