no images were found
पुणे- सोलापूर महामार्गावर कारमधून साडे तीन कोटींची रोकड भरलेल्या ६ बॅगा जप्त
पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर परिसरात नाकाबंदी करत असताना पोलिसांना एका ब्रीझा कारमध्ये पैशांच्या बॅगा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.एका ब्रीझा कारमधून मोठ्या प्रमाणावर रक्कम नेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात साडे तीन कोटींची रोकड आढळून आली. रात्री ६ पिशव्यात कोट्यावधी रुपयांच्या रक्कमेसह पैसे मोजण्याचे मशीनही पोलिसांनी जप्त केले आहे. जप्त केलेल्या गाडीत एकूण 3 कोटी 42 लाख 66 हजार 220 रुपये इतकी रक्कम आढळू आली आहे. दहाच्या सुमारास वाहतूक शाखा, लोणीकाळभोर आणि हडपसर पोलीसांनी ही कारवाई केली. या प्रकरणात प्रशांत धनपाल गांधी (वय, 47 वर्षे) या व्यक्तीला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेले प्रशांत धनपाल गांधी (रा. लासुर्णे ता.इंदापूर जि.पुणे हे खत विक्री,दूध व्यवसाय, तसेच किराणा दुकान व शेती व्यवसायिक असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ही रक्कम बॅँकेत भरण्यासाठी घेवून जात असल्याचीही माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे.
या प्रकरणी संबंधित वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून हडपसर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे. ही रक्कम कर्नाटक निवडणूकासाठी घेवून जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, पुणे आयकर विभाग या घटनेचा अधिक तपास करत आहेत.