no images were found
डी. वाय. पाटील हॉस्पीटलच्या डॉक्टरांचे यश
रूग्णाला जागृत ठेऊन मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया
कसबा बावडा/ वार्ताहर
डी. वाय पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे ब्रेन ट्युमरने त्रस्त असलेल्या एका रुग्णाला जागृत ठेवून त्यांच्या मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. न्यूरो सर्जन डॉ. उदय घाटे आणि भुलतज्ञ डॉ. संदीप कदम यांच्या टीमने ही दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी करून सबंधित रुग्णाला नवजीवन दिले आहे.कोल्हापूरमधील सुमारे ५० वर्षाच्या या रुग्णाला त्रास जाणवत असल्याने डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता ब्रेन ट्युमरचे (मेंदूतील गाठ) निदान झाले. रुग्णाच्या उजवा हात व पायाचे नियंत्रण मेंदूच्या ज्या भागातून होते त्या संवेदनशील भागात ही गाठ असल्याने ती गाठणे जोखमीचे होते. त्यामुळे महत्वाच्या भागाचे नुकसान टाळण्यासाठी या रुग्णाला जागृत ठेवून त्याच्यावर ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉ. उदय घाटे व त्यांच्या सहकाऱ्यानी घेतला.
सर्वात महत्वाचे काम होते ते रुग्ण व त्याचे नातेवाईक यांना विश्वासात घेण्याचे. त्याप्रमाणे डॉ. घाटे व त्यांच्या टीमने रुग्ण व त्यांचा मुलगा यांचे समुपदेशन करून संपूर्ण प्रक्रियेची माहिती दिली. त्यांची संमती मिळाल्यानंतर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ही प्रक्रिया तीन टप्प्यात करण्या आली. सुरुवातील रुग्णाला भूल देऊन त्यांच्या डोक्याचा भाग ओपन करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात त्याला शुद्धीवर आणण्यात आले. यावेळी त्याला हातपाय हलवत ठेवण्याचे सूचना देण्यात आल्या. हातापाया संबंधित नियंत्रण गमावण्याचा धोका टाळण्यासाठी या सूचना दिल्या जात होत्या. संबंधित गाठ काढल्यानंतर या रुग्णाला पुन्हा त्याला भूल देऊन डोक्याचा उघडलेला भाग बंद करण्यात आला, अशी माहिती डॉ. घाटे यांनी दिली.
यामध्ये भुलशास्त्र विभागप्रमुख डॉ. संदीप कदम, डॉ. रश्मी चव्हाण यांचे योगदान महत्वपूर्ण होते. योग्य मात्रेत भूल देऊन त्याला पुन्हा काही काळासाठी जागे करणे आणि हे करताना शस्त्रक्रियेवेळी रुग्णाला वेदनाही जाणवणार नाहीत याची काळजी घेणे हे कौशल्य खूपच महत्वपूर्ण ठरल्याचे त्यानी सांगितले. त्याचबरोबर ऑपरेशन थियेटरमधील कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रुग्णाचा उत्तम प्रतिसाद यामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. संबंधित रुग्णाला डिस्चार्जही देण्यात आला असून त्याची प्रकृती उत्तम असल्याचे डॉ. घाटे यानी सांगितले.
अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा व वैद्यकीय अधीक्षिका डॉ वैशाली गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हि शस्त्रक्रिया करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल डॉ. उदय घाटे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील यांनी अभिनंदन केले.