no images were found
राजर्षी शाहू महाराजांच्या मुंबईतील गिरगाव परिसरातील स्मृतीस्तंभाच्या ठिकाणी आवश्यक व्यवस्था पुरावा – डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या निधनस्थळी गिरगाव परिसरातील खेतवाडी परिसरातील गल्ली क्रमांक १३ येथे महापालिकेने उभारलेल्या स्मृतीस्तंभाची काळजी घेण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले.
महापालिकेने या ठिकाणी उभारलेल्या १२ फूट उंचीच्या दगडी कातळ स्तंभाची दुर्दशा झाल्याबद्दलचे वृत्त काल प्रसिद्ध झाले होते. याची तातडीने दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यामध्ये सुधारणा आणि डागडुजी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
उपसभापती कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली भेट
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनेनुसार आज त्यांच्या कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी संतोष उडतेवार, विपुल शिंदे अधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणीही केली. यावेळी महापालिका डी वॉर्डचे अधिकारी श्री. सांगोलकर हेही उपस्थित होते.
त्यांना व महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी आवश्यक त्या रंगरंगोटी, सुरक्षा व्यवस्था, रात्रीच्या वेळी लाईटस आणि नियमित स्वच्छता करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. यानुसार येथे आज सायंकाळपर्यंत रंगरंगोटी, लाईट आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याबद्दल अतिशय गंभीरतेने या विषयाकडे लक्ष देण्याचे निर्देश मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत. त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे त्यांनी मान्य केले आहे. तसेच महानगर पालिका युद्ध पातळीवर हे काम सुरू करणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यासाठी स्थानिक महापालिका अतिरिक्त आयुक्त श्री. आशिष शर्मा, सहाय्यक आयुक्त शरद उघडे आणि डी. बी. मार्ग पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप खुडे यांनी सहकार्य देण्याचे मान्य केले आहे.
यावेळी शिवसेना शाखाप्रमुख शशिकांत पवार, युवासेनेचे रोहित महाडिक हे देखील उपस्थित होते. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि कोल्हापूर शाहू प्रेमी नागरिकांच्या वतीने आज या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. तसेच उद्या छत्रपतींच्या स्मृतिदिनी उपसभापती कार्यालयातर्फे अभिवादन करण्यात येणार आहे.