
no images were found
लष्कराचं हेलिकॉप्टर चिनाब नदीत कोसळले; पायलट जखमी
किश्तावाडा जिल्ह्यातील मारवाह तालुक्यातील मछना गावाजवळ हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालंय तो अत्यंत दुर्गम परिसर असल्याचं सांगितलं जात आहे. या दुर्गम भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थांबून थांबून पाऊस पडत होता.या हेलिकॉप्टरमधून लष्कराचे तीन अधिकारी जात होते. पाऊस आणि खराब हवामानामुळे विमान क्रॅश झालं. या अधिकाऱ्यांचं काय झालं? याची काहीच माहिती सुरुवातीला मिळत नव्हती. रेस्क्यू टीम घटनास्थळी पाठवली गेली आहे. तर स्थानिक लोक बचावकार्य करत आहेत.
भारतीय लष्करानेही या दुर्घटनेची माहिती दिली आहे. हे हेलिकॉप्टर चिनाब नदीत कोसळल्याचं लष्कराने म्हटलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट आणि एक कमांडिंग अधिकारी होता. या दुर्घटनेतील कमांडिंग अधिकारी सुरक्षित असल्याचं सांगितलं जात आहे. पायलटला जखमा झाल्या आहेत. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येणार आहे. मात्र, दुसऱ्या पायलटचा अजून थांगपत्ता लागलेला नाहीये. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त कसं झालं याची ठोस माहिती समोर आलेली नाहीये. खराब हवामानामुळे हा अपघात झाला असावा असं सांगितलं जात आहे. मात्र लष्कराकडून या बाबतची कोणतीही माहिती दिली नाही.