
no images were found
कार्यकर्त्यांच्या भेटीला शरद पवार, आपल्या निर्णयावर मांडली स्पष्ट भूमिका
शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घ्यावा यासाठी वाय बी चव्हाण सेंटरच्या बाहेर आंदोलन सुरू होते, त्याच पार्श्वभूमीवर त्या आंदोलकांची भेट शरद पवार यांनी घेत मोठं भाष्य केलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पक्षातील नेत्यांसोबत कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. त्याच पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. या निर्णयानंतर कार्यकर्त्यांनी मुंबईतील वाय. बी सेंटरच्या बाहेरच उपोषण सुरू केलं. अनेक आमदारांनी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा सत्र सुरू केला आहे. या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी खुद्ध शरद पवार आज आले होते. पवारांनी कार्यकर्त्यांची भूमिका ऐकून घेत आपली भूमिका मांडली.
जो काही निर्णय मी घेतला तो पक्षाच्या भवितव्यासाठी घेतला आहे. उद्या पक्षाचे काम कसे चालणार, यासाठी निर्णय घेतला आहे. आम्ही जोपर्यंत भक्कमपणे त्यांच्या पाठीमागे आहोत, पक्ष शक्तिशालीपणे उभा करावा, हा त्याचा हेतू होता. पण ही गोष्ट खरी आहे, असा निर्णय घेत असताना आधी सहकाऱ्यांची चर्चा करावी लागते. पण मला खात्री होती, मी तुम्हा लोकांशी चर्चा केली असती तर तुम्ही हो कधी म्हटलं नसतं. आणि त्यामुळे तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेतला नाही. देशभरातून अनेक तुमचे सहकारी आले होते, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. बाहेरच्या लोकांशी चर्चा करून एक ते दोन दिवसांमध्ये निर्णय घेऊ. कार्यकर्त्यांची जी भावना आहे, ती दुर्लक्षित केली जाणार नाही. एवढंच मी तुम्हाला सांगतो, दोन दिवसांच्या नंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही, असं शेवटी शरद पवार म्हणाले.