no images were found
11 तासांत केली 11 लहान मुलांवर मॅरेथॉन हृदयरोग शस्त्रक्रिया
नवी मुंबई : नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स या अग्रगण्य व बहु वैशिष्ट्यपूर्ण वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या रुग्णालयाने महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील 11 लहान मुलांवर हृदयाच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. 4 ते 13 वर्षे वयोगटातील या 11 मुलांना जन्मापासूनच हृदयविकार होता. या रोगावर उपचार केला नसता तर कुपोषण आणि दीर्घकालीन गंभीर समस्या उद्भवण्याचा धोका असतो. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स हे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) योजनेअंतर्गत देखील रुग्णांना उपचार प्रदान करते. आरबीएसके योजनेअंतर्गत जिल्हा वैद्यकीय अधिकारी जन्मजात हृदयविकार असलेल्या लहान मुलांना हेरतात आणि त्यांची तपासणी करतात त्याचबरोबर तज्ञडॉक्टर निदानाची पुष्टी करतात आणि त्यांच्यावर उपचार करतात. रुग्णांना दिले जाणारे उपचार या योजनेंतर्गत समाविष्ट केले जातात, त्यामुळे उपचारांवर होणारा खर्च खूपच कमी होतो आणि त्यांच्या कुटुंबाला दिलासा मिळतो.
नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सचे पॅडिएट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. भुषण चव्हाण म्हणाले, “सप्टेंबरमध्ये आमच्या टीमने वाशिम सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. तिथे आम्ही जन्मजात हृदयविकार असल्याची शंका असलेल्या 120 मुलांची इकोकार्डिओग्राफी केली. 120 मुलांपैकी 35 मुलांना जन्मजात हृदयविकार होता. 35 पैकी 40% मुलांवर अँजिओग्राफीद्वारे उपचार करण्याचे नियोजन करण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटल्सची अनुमती घेऊन मुलांना अँजिओग्राफी डिव्हाइस क्लोजरच्या प्रक्रियेसाठी नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे आणण्यात आले. प्रक्रियेच्या दिवशी सकाळी 7.30 वाजता डॉक्टरांनी शस्त्रक्रियेला सुरुवात केली आणि एका पाठोपाठ एक अशाप्रकारे शस्त्रक्रिया पार पाडली. 11 पैकी 5 मुलांना पेरी-मेम्ब्रेनस व्हॅस्क्युलर रोग झाला होता, हा रोग आव्हानात्मक होता तरी देखील शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडलीच. मुलांना शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी रुग्णालयातून सोडण्यात आले. या दरम्यान कोणतीही प्रतिकूल घटना घडली नाही आणि संपूर्ण शस्त्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. आता या मुलांना पहिल्या महिन्याच्या अखेरीस आणि 6 महिन्यांनंतर पाठपुरावा करण्यासाठी भेट द्यावी लागणार आहे, या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही प्रक्रियेची आवश्यकता नाही. उर्वरित मुलांवर देखील नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे उपचार केले जाणार आहेत.