no images were found
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघातात; 13 प्रवाशांचा मृत्यू तर 29 लोक जखमी
खोपोली : लोणावळ्याजवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एक खासगी बस 500 फूट खोल दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झाला.या अपघातात 29 लोक जखमी झाले आहेत. आज पहाटे चारच्या सुमारास प्रवाशी गाढ झोपेत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. बस कोसळल्याने धडाम धडाम आवाज येताच काही प्रवासी भानावर आले. त्यांनी लगेच किंचाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे या दरीतून केवळ किंचाळण्याचा आवाज येत होता. काही तरी आक्रीत घडल्याची जाणीव होण्याआधीच बस दरीत कोसळली. त्यामुळे कुणाचं डोकं, कुणाचं शरीर तर कुणाचे पाय बसवर आदळले. अनेकांना मुक्का मार लागला. काळोखात काहीच दिसत नव्हतं. जे जिवंत होते त्यांना आपण कुठे आहोत हेही कळत नव्हतं. अचानक झालेल्या या अपघातामुळे प्रवाशांनी मदतीसाठी एकच टाहो फोडला. वाचवा वाचवा… कुणी आहे का? असा पुकारा सुरू झाला. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. या ठिकाणी सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.लोणावळ्याजवळ बोरघाट परिसरातील शिंगरोबा मंदिराजवळ ही दुर्घटना घडली. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही बस साईड बॅरियर तोडून सुमारे 500 फूट खोल दरीत कोसळली. त्यामुळे बसचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. ही बस पुण्यावरून मुंबईला निघाली होती
स्थानिकांनी घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांना माहिती दिली आणि मदतकार्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केलं. अपघातातील जखमींना बाहेर काढलं जात आहे. रात्रीचा अंधार असल्याने या बचावकार्यात अडथळे निर्माण होत होते. मात्र, उजाडताच या मदतकार्याच्या कामास वेग आला आहे. क्रेन मागवून बस बाजूला केली जात आहे. रुग्णवाहिकेतून जखमींना खोपोली नगर पालिकेच्या दवाखान्यात दाखल केलं जात आहे. तसेच अपघातामुळे या परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. या महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.