no images were found
फुले-शाहू-आंबेडकरांकडून भारताला सामूहिक शहाणपणाचा समृद्ध वारसा: डॉ. रमेश कांबळे कोल्हापूर, (प्रतिनिधी ): महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजाला सामूहिक शहाणपणाचा समृद्ध वारसा दिला आहे. हा वारसा वृद्धिंगत करणे हेच त्यांच्या कार्याचे खरे फलित ठरेल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समाजशास्त्रज्ञ डॉ. रमेश कांबळे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या ‘फुले-शाहू-आंबेडकर’ सप्ताहांतर्गत आज डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानाचे प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सार्वजनिक चिकित्सक अवकाश’ या विषयावर त्यांचे राजर्षी शाहू सभागृहात व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
डॉ. रमेश कांबळे म्हणाले, फुले-शाहू-आंबेडकर हे समाजातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व आर्थिक समस्यांचा साकल्याने विचार करून त्यांच्या मूलभूत पुनर्रचनेसाठी आग्रही असणारे नेते होते. एकूण समाजाची मानसिक जडणघडण ही मानवी मूल्यांवर होणे त्यांना अभिप्रेत होते. या मूल्यांप्रती समाजात समर्पणशीलता असल्याखेरीज आपल्याला खऱ्या अर्थाने या त्रयीच्या विचारांना साजरे करता येणार नाही. आज समाजात परस्परभेद, विषमता आणि अन्य समाजाच्या दुःखाबद्दलची असंवेदनशीलता मोठ्या प्रमाणात आहे. आपण एक समाज म्हणून जर एकत्र येऊ शकत नसू, तर एक राष्ट्र म्हणून कसे उभे राहू शकू, हा आजघडीचा कळीचा मुद्दा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार असल्याचे सांगून डॉ. कांबळे पुढे म्हणाले, आधुनिक विचारांच्या पायावर आधुनिक भारताची जडणघडण करण्याची कामगिरी डॉ. आंबेडकर यांनी केली. गेल्या दशकभरात बाबासाहेब परीघावरुन चर्चाविश्वाच्या केंद्रस्थानी आले आहेत, त्याला त्यांची हीच कामगिरी कारणीभूत आहे. बाबासाहेबांकडे दुर्लक्ष करून आपल्याला पुढे जाता येणार नाही. जोपर्यंत इथल्या प्रत्येक व्यक्तीचे अधिकार आणि व्यवस्थेवरील दावा प्रत्यक्षात येत नाही, तसेच संविधानिक नैतिकता आणि संविधानिक मूल्यांची प्रस्थापना होत नाही, तोवर या देशात खऱ्या अर्थाने लोकशाही विकसित होऊ शकणार नाही. असमानता, शोषण, अन्याय आणि गुलामगिरी या मुद्द्यांना भिडल्याखेरीज ‘भारत’ ही संकल्पना पूर्णत्वास जाऊ शकत नाही. त्यासाठी बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे, या देशातील राजकीय समानता आणि सामाजिक-आर्थिक असमानता यांमधील दरी कमी केल्याखेरीज खरी लोकशाही अस्तित्वात येणे अशक्य आहे.