no images were found
‘विद्यार्थ्यांनी कर्तुत्ववान व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा’- के. जी. पाटील.
कोल्हापूर (उचगाव ): प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निक आयोजित ‘Digifest-2023’ या नॅशनल टेक्निकल सिंपोझियमच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘या बोर्डिंगची स्थापना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केली. त्यांनी समाजातील वंचित व मागास घटकांच्या उद्धारासाठी त्यांच्या शिक्षणावर भर दिला. त्यांच्या शैक्षणिक व समाजसुधारक धोरणांमुळेच आज कोल्हापूर हे देशात विविध क्षेत्रात अग्रेसर आहे.
त्यांच्याच या संस्थेने आतापर्यंत समाजातील सर्वच घटकांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी धोरण राबवले आहे. संस्थेची वाटचाल राजर्षींच्या विचारांवरच चालू आहे. कोल्हापूरच्या तसेच महाराष्ट्राच्या विकासात या संस्थेतील विद्यार्थ्यांचे बहुमोल योगदान राहीले आहे. डिजीफेस्ट सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी संशोधनाकडे वळतील, त्यांच्यातून नवउद्योजक घडतील अशी अपेक्षा आहे.’
प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ‘न्यू पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धात्मक व व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे धोरण आहे. सध्याचे हे डिजिटल युग आहे, प्रत्येक क्षेत्रात डिजिटल टेक्नाॅलाजी वापरण्याचे दिवस आहेत. त्या अनुषंगानेच या स्पर्धेची आखणी केली आहे. अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्यात अमुलाग्र बदल होतो. ते विचारप्रवण होतात. डिजीफेस्टच्या माध्यमातून विचारांची, संकल्पनांची व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होत असते. विद्यार्थ्यांनी समाजातील समस्या शोधून त्याला पर्याय देण्यासाठी प्रकल्पांवर काम करावे.’
संस्थेच्या संचालिका सौ. सविता पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, ‘अशा स्पर्धांमधून उद्योग व तंत्रज्ञान जगतातील नवीन घटना समजतात, त्यावर चर्चा होते, आपल्या कार्यक्षेत्रातील ज्ञान अद्ययावत होते. विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांत सहभागी होण्यासाठी धाडस दाखवावे. मदर तेरेसा म्हणत की जे धाडस दाखवून कृती करतात, यश हे त्यांचेच असते.’
या स्पर्धेत टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन, क्विझ काॅन्टेस्ट, माॅडेल मेकिंग, पोस्टर प्रेझेंटेशन, आयडीयाथाॅन, फार्मसी माॅडेल मेकिंग या उपक्रमांत जवळपास ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय डिपेक्स स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक प्रा. अश्विनकुमार व्हरांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालिका सौ. सविता पाटील, संचालक वाय. एस. खाडे, आर. डी. पाटील, प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे, न्यू काॅलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डाॅ. रविंद्र कुंभार, रजिस्ट्रार प्रा. नितीन पाटील, तज्ञ परिक्षक डाॅ. अरविंद कदम, न्यू पॉलिटेक्निकमधील विभागप्रमुख, स्टाफ, सहभागी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी केले. आभार प्रा. रोहन देसाई यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. प्रविण जाधव यांनी वंदे मातरम गीत सादर केले.