
no images were found
पुणे-सोलापूर महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात
पुणे : कुरकुंभ व मळद ता.दौंड च्या हद्दीतील घागरे वस्तीजवळ पहाटे सहाच्या सुमारास खाजगी बसचा अपघात झाला. खासगी प्रवासी बसला टेम्पोने धडक दिल्याने हा अपघात झाला.बस महामार्ग व सेवा रस्त्याच्या दरम्यान मोरीत जाऊन पडली. बसमध्ये भवानी पेठ परिसरातील ३१ प्रवासी होते. त्यांपैकी २२ जणांना नजिकच्या दौंड, भिगवण येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. नऊजणांवर रुग्णवाहिकेत उपचार करण्यात आले.
चैत्र पौर्णिमेला तुळजापूर, येरमाळा येथील देवदर्शन करून बस पुण्याकडे जात होती. यामधील सर्व भाविक प्रवाशी भवानीपेठ, पुणे परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी देखील तत्परतेने धाव घेत जखमींना बाहेर काढले. याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत.
१०८ रुग्णवाहिका सेवेचे पुणे जिल्हा समन्वयक डॉ. प्रियांक जावळे म्हणाले, बारामती, दौंड, मोरगाव, यवत, कुरकुंभ आणि भिगवण येथील सहा १०८ रुग्णवाहिका तातडीने अपघातस्थळी रवाना करण्यात आल्या. जखमी रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. ११ प्रवासी गंभीर जखमी आहेत, असेही डॉ. जावळे यांनी सांगितले.