no images were found
मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी कर्ज न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
कोल्हापूर : बँकाकडून तसेच पीक विमा कंपन्यांकडून शेतीच्या कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करणे हा प्रकार नवीन नसला, तरी आता कोल्हापूर जिल्ह्यात संतापाचा कडेलोट होईल, असा प्रकार समोर आला आहे. बँकेनं कर्ज नाकारल्याने एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी कोल्हापूर जिल्ह्यातून येत आहे.मुलाच्या वैद्यकिय शिक्षणासाठी बँकेने शैक्षणिक कर्ज दिलं नाही. अनेकदा बँकेकडे विनंती आणि अर्ज करूनही, त्याची दखल बँकेने घेतली नाही. त्यामुळे नैराश्यातून शेतकऱ्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. महादेव पाटील (वय वर्ष 45, रा. पिसात्री ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणात बँकेकडून कोणताही खुलासा आलेला नसला, तरी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुबीयांनी मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी कर्ज न दिल्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महादेव पाटील यांचा मुलगा बीएचएमएसचे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्यामुळे त्याची वैद्यकीय शिक्षणाची फी भरण्यासाठी जवळच्या कॅनरा बँकेत संपर्क साधला होता. शेतकऱ्याने वारंवार कर्जासाठी बँकेचे खेटे मारले, कर्ज आज देऊ-उद्या देऊ असं करत, कर्ज देण्याचे वारंवार टाळण्यात आले. या शेतकऱ्यावर शेतीचं कर्ज होतं, मुलाच्या शिक्षणाची चिंता होती.या सर्वाचा शेतकऱ्यावर दबाव आला होता. या सगळ्याचं नैराश्य येऊन, महादेव पाटील या शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.