
no images were found
ठाकरे-फडणवीस भेटीवर संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र हे एक संस्कारी राजकारण करणारं राज्य
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणत्या क्षणी राजकीय भूकंप होईल, याबाबत काहीच सांगता येत नाही. राज्यात नऊ महिन्यांपूर्वी सत्तांतर घडून आलं. या घडामोडींनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील राजकारण अक्षरश: ढवळून निघालं. दरम्यान, अशातच आज एक वेगळी आणि आश्चर्यकारक घटना घडली. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज अनेक महिन्यांनी भेट झाली. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. याच भेटीवर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ‘उद्धव ठाकरेंनी वारंवार विधानसभेत जायला हवं.
म्हणजे एकत्र भेटतील, बोलतील, चर्चा करतील. महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. विरोध राजकीय असतो, व्यक्तीगत नसतो. कटुता संपवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. निवडणुकीत तुमचा पराभव करु. विचारांची लढाई विचारांनी करु. पण सुडाने, बदल्याच्या भावनेने कारवाई करणार असाल आणि तशी भाषा करणार असाल तर मग आम्हाला तशाच भाषेत उत्तर द्यावं लागेल’ महाराष्ट्र हे एक संस्कारी राजकारण करणारं राज्य आहे”, असं संजय राऊत म्हणाले.