Home शैक्षणिक जीवन हेच शिक्षण मानणारी महात्मा गांधींची ‘नई तालीम’ आजही प्रस्तुत: डॉ. अभय बंग

जीवन हेच शिक्षण मानणारी महात्मा गांधींची ‘नई तालीम’ आजही प्रस्तुत: डॉ. अभय बंग

13 second read
0
0
29

no images were found

जीवन हेच शिक्षण मानणारी महात्मा गांधींची नई तालीमआजही प्रस्तुत: डॉ. अभय बंग

कोल्हापूर : शिक्षणाच्या बाबतीत खडबडून जागे व्हावे, अशी स्थिती आजच्या भोवतालामध्ये आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष जीवनात घडणाऱ्या शिक्षणाला नई तालीमचे स्वरुप देणाऱ्या गांधीजींच्या शैक्षणिक संकल्पनेची प्रस्तुतता अबाधित आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठात ‘आजचे शिक्षण आणि महात्मा गांधी यांचे उपाय’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर व डॉ. नंदा पारेकर लिखित ‘महात्मा गांधी आणि त्यांचे सांगाती’ आणि विजय तांबे लिखित ‘महात्मा गांधींचे लोकविलक्षण अनुयायी: गोपराजू रामचंद्र राव’ या दोन पुस्तकांचे डॉ. अभय बंग यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

डॉ. बंग यांनी आपल्या व्याख्यानामध्ये आजच्या शैक्षणिक परिस्थितीचा अत्यंत साकल्याने वेध घेतला आणि त्या अनुषंगाने महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या नई तालीम शैक्षणिक संकल्पनेचे महत्त्व व प्रस्तुतता विषद केली. ते म्हणाले, महात्मा गांधींच्या अनुभवातून नई तालीम शिक्षणप्रणाली उदयास आली. त्या संकल्पनेचा विकास विनोबांनी केला. महात्मा गांधी यांना पाहू शकलो नसल्याचे आयुष्यभराचे दुःख असले तरी त्यांनी सुरू केलेल्या शाळेत विनोबांकडून शिकलो, ही पुण्याई आहे. शिक्षणाचे उद्दिष्ट आपल्याला जीवनातच शोधावे लागते, हा नई तालीमचा गाभा आहे. त्यामुळे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जबाबदारी आणि त्याच बरोबर बौद्धिक आव्हानही दिले जायचे. जीवनातली कर्तव्यकर्मे करता करता मिळणारे शिक्षण याला विनोबा स्वधर्म म्हणत. आजकाल कर्तव्यकर्मांच्या जाणिवेचाच अभाव असल्याने शिक्षणप्रक्रिया घडूनच येत नाही. मुळात शिक्षण हे देताही येत नाही, व घेताही येत नाही, तर ते घडते. शरीरश्रम, बुद्धीला चालना यांसह प्रत्यक्ष जीवनात घडणाऱ्या शिक्षणाला अशा प्रकारे गांधीजींनी नई तालीमचे स्वरुप दिले. ज्ञान हे प्रत्येकामध्ये आहेच, फक्त त्यावरील अज्ञानाची पुटे काढून टाकण्याचे काम शिक्षकाला करावयाचे असते. यातून मी कोण आहे, हे समजणे म्हणजे शिक्षण आहे. मोजक्या शब्दांत सांगायचे तर जीवन हेच शिक्षण आहे. केवळ आपण त्या दृष्टीने जीवनाच्या हरेक अंगाकडे पाहायला शिकले पाहिजे.

महात्मा गांधी यांना सामान्यातल्या सामान्य माणसामध्ये उपयोगितावादाच्या पलिकडे विलक्षण रस असे. त्यामुळे जगभरातून त्यांना निस्वार्थ अनुयायी लाभले. त्यांची ईश्वरी मावनरुपाऐवजी निर्गुण ईशतत्त्वावर श्रद्धा होती. पुढे ईश्वर हा सत्य आहे आणि त्यापुढेही जाऊन सत्य हाच ईश्वर आहे, असा झालेला प्रवास हा खूपच रोमांचक आहे कारण त्यापुढे मग आस्तिक-नास्तिक असा भेदच मुळी उरत नाही, असेही डॉ. बंग यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले की, नई तालीम ही महात्मा गांधी यांनी जगाला दिलेली सर्वोत्तम भेट आहे. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आजच्या धुरिणांनी तिची आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये कशा प्रकारे अंमलबजावणी करता येऊ शकेल, या दृष्टीने चिंतन करण्याची गरज आहे.

यावेळी डॉ. अशोक चौसाळकर यांनी ‘महात्मा गांधी आणि त्यांचे सांगाती’ या पुस्तकाविषयी आणि डॉ. भारती पाटील यांनी ‘महात्मा गांधींचे लोकविलक्षण अनुयायी: गोपराजू रामचंद्र राव’ या पुस्तकाविषयी मनोवेधक विवेचन केले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. दशरथ पारेकर यांनीही पुस्तकांच्या लेखनप्रेरणेविषयी मनोगत व्यक्त केले. गांधी अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…