
no images were found
केंद्र सरकारने आजची केलेली वाढ ही तर उंदराची पिल्ली हाताला लागलेला प्रकार :- माजी खासदार राजू शेट्टी
कोल्हापूर ( प्रतिनिधी ): केंद्र सरकारने आजची केलेली वाढ ही डोंगर पोखरून उंदीर नव्हे तर उंदराची पिल्ली हाताला लागलेला प्रकार असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केले आहे.
केंद्र सरकारने आज एफ. आर. पी मध्ये क्विंटलला दहा रुपये म्हणजेच प्रति टनास शंभर रुपयाची वाढ करून शेतकऱ्यांना मोठी मदत केली असल्याचा डांगोरा पिटत आहे. वास्तविक पाहता केंद्र सरकारने आज जी दहा रुपयाची वाढ केलेली आहे ती वाढ करत असताना कोणत्या आधारे केली. उत्पादन खर्च कोणता धरला.
वास्तविक पाहता उत्पादन खर्चामध्ये गेल्या वर्षभरात जवळपास 33 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये रासायनिक खतांची वाढ ही 22 टक्क्याहून होऊन अधिक वाढलेली आहे. यामुळे आज झालेली वाढ ही फक्त सव्वातीन टक्के असल्याने यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सध्या उसाची शेती ही तोट्याची शेती झालेली आहे.
कृषी मूल्य आयोगामध्ये बसलेल्या विद्वानांनी एक टन उसाचा खर्च १५७० रुपये दाखवलेला आहे व त्या उत्पादन खर्चावर आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुप्पट पैसे देत आहोत हा डांगोरा पेटवत आहे. कृषी मूल्य आयोगाने कोणत्या संशोधन केंद्रामध्ये अथवा देशातील कोणत्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये इतक्या खर्चात काढला हे दाखवून द्यावे. सरकारने साखर कारखानदारांना खुश करण्यासाठी ही एफआरपी वाढवलेली आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाढलेल्या महागाईमुळे व उत्पादन खर्चामध्ये जवळपास 52% ची वाढ झालेली आहे. यामध्ये रासायनिक खते ,मजुरी ,मशागत, तोडणी वाहतूक ,खते ,कीटकनाशके यांचे दर गगनाला जाऊन भिडलेले आहेत. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास गेल्या पाच वर्षात फक्त शेतकऱ्यांना टनाला 350 रुपयाची वाढ मिळालेली आहे.