no images were found
सत्तेचा गैरवापर करुन विरोधकांना भीती दाखविण्याचे राजकारण ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही: सुप्रिया सुळे
बारामती : छापे पडणार याची माहिती अगोदरच कशी बाहेर पडते, याची चौकशी गृहमंत्री अमित शहा यांनी करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली. सत्तेचा गैरवापर करुन विरोधकांना भीती दाखविण्याचे सुरु असलेले राजकारण ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा शब्दात सुळे यांनी सध्या सुरु असलेल्या तपास यंत्रणांच्य कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली. बारामतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी या सर्व विषयावर मत मांडले. त्या म्हणाल्या, ईडी व सीबीआयचा तुम्ही डेटा तपासला तर केस दाखल झाल्यानंतर काय होते हेही एकदा पाहायला हवे. “संजय राऊत यांच्या केसची ऑर्डर बघा. अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटीचा आरोप केला आणि आता 1 कोटीचा आरोप करत आहे.. मग 99 कोटींचं काय झालं? आरोप करायचा आणि पळून जायचे ही भारतीय संस्कृती नाही. विरोधी पक्षांच्याच नेत्यावर ईडी कारवाई करते याचे आता अजिबात आश्चर्य वाटत नाही भाजप सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना भीती घालत आहेत. जे लोक भाजपमध्ये गेले त्यांच्यावरच्या कारवाया थांबल्या आहेत, असे दिसते पण आम्ही घाबरणारे नाही”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
राजकीय बदला घेण्यासाठी तपासयंत्रणांचा गैरवापर होणे दुर्देवी आहे. देशाच्या महत्वाच्या तपास संस्था म्हणून ईडी किंवा सीबीआयचा नावलौकीक आहे, स्वतंत्र यंत्रणा म्हणून इतकी वर्षे त्यांनी काम केले आहे, सध्या सुरु असलेली दडपशाही ही दुर्देवी व संविधानाबाहेरची असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
ज्या पध्दतीने नबाब मलिक, संजय राऊत, अनिल देशमुख, एकनाथ खडसे यांच्या कुटुंबावर पडणारे छापे, हसन मुश्रीफ यांच्यावरही आता छापे घातले जातात ईडी आणि सीबीआयची रेड होणार आहे, हे आधी कसं कळतं? हे आधी कळत असेल तर या राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न आहे .त्यावर अमित शाह यांनी कमिटी नेमली पाहिजे. देशाला उत्तर दिले पाहिजे की या लिकेजेस कशा होतात ते…, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.