no images were found
मागास प्रवर्गातील मुला-मुलींच्या वसतिगृहाकरिता इमारत मालकांनी संपर्क साधावा – विशाल लोंढे
कोल्हापूर : शहरामध्ये इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील 100 मुले व 100 मुलींकरीता वसतिगृहासाठी दोन इमारती भाडयाने घेण्यात येणार आहेत. अशा प्रकारच्या इमारती असलेल्या व त्या वसतिगृहाकरीता शासनास भाड्याने देण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कोल्हापूर (दूरध्वनी क्र. 0231-2651318) येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांसाठी एक व मुलींसाठी एक वसतिगृह सुरु करण्यात येणार आहे. या वसतिगृहासाठी इमारती भाड्याने देण्याकरिता अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत-
रुपयाच्या बंधपत्रावर इमारत मालकाचे इमारत भाड्याने देण्याबाबत संमतीपत्र. ज्यामध्ये इमारत मालकाचे संपूर्ण नांव, वय, पत्ता, इमारतीचा तपशील, इमारतीचे क्षेत्रफळ, इमारतीमधील एकूण खोल्या, स्नानगृह, स्वच्छतागृह, वीजेची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, मोकळे मैदान, वॉल कंपाऊंड, पाणी साठविण्याची व्यवस्था, पाण्याचा स्त्रोत इत्यादी बाबी स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. इमारतीचा स्थानिक स्वराज्य संस्थेने दिलेल्या बांधकामाचा पूर्णत्वाचा दाखला, भोगवटा प्रमाणपत्र. सार्वजनिक बांधकाम विभाग / जिल्हाधिकारी ठरवतील त्याप्रमाणे इमारतीचे भाडे घेण्यास इमारत मालक तयार असल्याबाबतचा तपशील.
इमारतीचे सर्व प्रकारचे कर उदा, भाडेपट्टीकर, मालमत्ता कर, व्यवसाय कर हे सर्व कर इमारत मालक भरणार असल्याबाबत इमारत मालकाचे संमतीपत्र. इमारतीचे टायटल निर्धोक असल्याबाबतचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमाणपत्र. इमारतीवर कुठल्याही प्रकारचा बोजा नसल्याचे इमारत मालकाचे हमीपत्र. स्थानिक स्वराज्य संस्थेने नोंद केलेला इमारतीचा दाखला उदा. 8-अ चा उतारा, प्रॉपर्टी कार्ड उतारा इत्यादी. इमारतीचे क्षेत्रफळ मोकळ्या जागेसह प्रति विद्यार्थी 100 चौ. फुटापर्यंत असावे. इमारतीचा परिसर विद्यार्थ्यांना राहण्यास आरोग्य दृष्ट्या योग्य असल्याबाबत आरोग्य अधिकाऱ्याचा दाखला. वसतिगृह इमारतीमध्ये गृह प्रमुख यांच्या निवासस्थानासाठी व्यवस्था असणे आवश्यक आहे व इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी मुख्य रस्त्याशी जोडणारा जोड रस्ता निर्धोक असावा, याप्रमाणे आहे.