no images were found
संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी दोघे संशयित पोलिसांच्या ताब्यात
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी मॉर्निंग वॉकला जात असताना हल्ला झाला होता, त्याचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.त्यात दिसणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघेही भांडुप पश्चिम भागातील रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.एक जण हा शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे.
अखेर या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. हे दोघे जण भांडुप पश्चिम भागातील रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस इतर संशयितांचा शोध घेत आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांपैकी सोळंकी असे एका संशयिताचे नाव असून तो शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
आता या दोघांनी देशपांडे यांच्यावर हल्ला केला आहे का, त्यामागे नेमके कोण आहे, कुणाचा हात त्यापाठी आहे, पूर्ववैमनस्यातून हे कृत्य घडले आहे का, राजकीय संदर्भ त्यामागे आहे का, अशा विविध गोष्टींची उकल आता पोलिस करणार आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाकडून याचा तपास आता सुरू झाला आहे. त्यातून देशपांडे यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचे खरे कारण समोर येऊ शकेल. मात्र या दोघांच्या हातात कोणताही रॉड अथवा स्टम्प दिसत नाही. ते नंतर त्यांना कुठून मिळाले अथवा कुणी दिले याचाही तपास आता पोलिस करतील.हे दोघे हाफ पँटमध्ये असल्याचे दिसत असून एकाने हिरवा तर एकाने राखाडी रंगाचा टीशर्ट परिधान केल्याचेही त्यात दिसते आहे. या दोनजणांना भांडूप येथून ताब्यात घेण्यात आले आहे. भांडुप हा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत गड मानला जातो, तसेच राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे येथील आमदार आहे, या प्रकरणात पोलीसाकडून या दोघांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हल्ल्याच्या वेळी हल्लेखोर हे ‘वरूणला नडतो काय, ठाकरेला नडतो काय’ अशी धमकी देत होते अशी माहिती संदीप देशपांडे यांनी पोलीसाना दिलेल्या जबाबात दिली आहे. राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसानी दिली, या हल्लेखोराला अटक करण्यासाठी शिवाजी पार्क पोलिसांनी ८ पथके तयार केली होती, तसेच गुन्हे शाखा कक्ष ५चे पथक देखील या हल्लेखोरांच्या मागावर होते.