
no images were found
महानगरपालिकेत डीपॉझीट जप्त झालेल्या संजय पवारांनी विधानसभेची स्वप्ने रंगवू नयेत : रणजीत जाधव
कोल्हापूर : प्रत्येक निवडणुकीत शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या विरोधात गद्दारी करणारे बोलबच्चन संजय पवार यांना विधान सभेची स्वप्ने पडत आहेत. ज्यांनी नेहमीच शिवसेना उमेदवाराविरोधात गद्दारी केली त्यांना शिवसेना आणि धनुष्यबाणाचे नाव वापरण्याचा नैतिक अधिकार नाही. महापालिकेत डीपॉझीट जप्त झालेल्या संजय पवारांनी विधानसभेची स्वप्ने रंगवू नयेत, असा टोला शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव यांनी लगावला.
शिवसेना उत्तर शहरप्रमुख रणजीत जाधव पुढे म्हणाले कि, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांनी दिलेल्या धनुष्यबाण आणि शिवसेना उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रत्येक निवडणुकीत गद्दारी करणाऱ्या संजय पवार व बगलबच्यानी शिवसेना विरोधी प्रचार केल्याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. त्यावरून ते किती सच्चे शिवसैनिक आहेत हे त्यांचे त्यांनाच कळून चुकेल. त्यामुळे खरे गद्दार असणाऱ्या संजय पवार आणि बगलबच्च्यांना शिवसेना नाव वापरण्याचा नैतिक अधिकार नाही. एका जबाबदार वर्तमानपत्रात स्थायी समिती निवडणुकीत संजय पवार यांनी तीस लाखाचा व्यवहार केल्याची “संजय पवार यांचा खरा चेहरा” अशा मथळ्याची बातमी छापली आहे. त्यामुळे त्यांची जनतेत किती स्वच्छ प्रतिमा आहे आणि पवार किती गद्दार आहेत हे कोल्हापूरच्या जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही. संजय पवारांची गद्दारी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गातून पाहत आहेत. त्याचमुळे संपूर्ण संख्याबळ असताना देखील राज्यसभेच्या निवडणुकीत संजय पवारांचा पराभव हा शिवसेनाप्रमुखांनी दिलेला शाप आहे. त्यामुळे विधानसभा दूरच संजय पवार यांनी महानगरपालिकेची निवडणूक लढवून स्वत:चे चारित्र जनतेतून सिद्ध करावे, असे आवाहनही शहरप्रमुख रणजीत जाधव यांनी केले आहे.