
no images were found
नोकरीच्या आमिषाने ४५ जणांची फसवणुक, परीक्षा परिषद आयुक्त शैलजा दराडेंसह भावावर गुन्हा
पुणे : शिक्षण विभागात शिक्षक पदावर नोकरी लावून देतो असे सांगून सुमारे ४५ जणांकडून लाखो रुपये स्विकारुन त्यांना नोकरीस न लावता तसेच त्यांचे पैसे परत न करता त्यांची आर्थिक फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार चक्क परीक्षा परिषदेच्या आयुक्त आणि त्यांच्या भावाने केला आहे.
याप्रकरणी परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे (रा.पाषाण,पुणे) यांच्यासह भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा.अकोले. ता.इंदापूर,पुणे) यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत सांगली जिल्हयातील एका ५० वर्षीय शिक्षकाने हडपसर पोलिस ठाण्यात परिक्षा परिषदेच्या आयुक्त व त्यांच्या भावा विरोधात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार१५ जून २०१९ ते आतापर्यंत घडलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलजा रामचंद्र दराडे ऊर्फ खाडे या परिक्षा परिषदेच्या आयुक्त म्हणून काम करत आहे. त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे याने तक्रारदार यांना बहीण शैलजा दराडे या शिक्षण विभागात वरिष्ठ पदावर काम करत असून शिक्षक म्हणून नोकरीस लावण्याचे काम त्या करुन देऊ शकतात असे सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांच्या दोन वहिनींना शिक्षक पदावर नोकरी लावतो असे सांगत, त्यांच्याकडून प्रत्येकी १२ लाख रुपये आणि १५ लाख रुपये असे एकूण २७लाख रुपये घेण्यात आले.
परंतु त्यानंतर त्यांना शिक्षक पदावर नोकरीस न लावता, टाळाटाळ करण्यात आली आणि सतत पैशाची मागणी करुनही त्याची परतफेड आरोपींनी केली नाही. अशाचप्रकारे आणखी ४४ जणांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पुढील तपास हडपसर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. थोरबोले करत आहे.
दरम्यान याप्रकरणी परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दावा केला आहे की, माझा भाऊ दादासाहेब दराडे हा माझ्या पदाचा गैरवापर करुन लोकांना शिक्षक पदावर नोकरीस लावून देतो असे अमिष दाखवून पैसे घेत होता ही बाब समजल्यावर मी त्याच्याशी वर्षापूर्वीच नाते तोडलेले आहे. त्याच्या सोबत कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार कोणी करु नये अशाप्रकारची जाहीर नोटीसही ऑगस्ट २०२०मध्ये देण्यात आलेली होती.