no images were found
पंचमहाभूत लोकोत्सवास तीस लाख लोक येणार -अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजी
कोल्हापूर – कणेरी मठ : आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पंचतत्वांचे महत्त्व निसर्ग आणि मानवी जीवनात फार आहे. या तत्त्वांचे संवर्धन करणे अर्थात पर्यावरण जपणे अत्यंत आवश्यक आहे. याच अनुषंगाने माती, पीक व आरोग्य सदृढ राहण्यासाठी लोकजागृती व्हावी या हेतूने कणेरी येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव आयोजित केला आहे. मठाच्या 650 एकर जागेवर 20 ते 26 फेब्रुवारी पर्यंत होणाऱ्या लोकोत्सवात भारतातील आणि अन्य दशातील जवळपास 30 लाख लोक सहभागी होतील. इतक्या मोठ्या संख्येने लोक येणार आहेत याच बरोबर अनेक मान्यवर व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये व हा कार्यक्रम प्रभावी व्हावा यासाठी यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी रोज सकाळी ८ ते १० या वेळेत स्वामीजींच्या उपस्थितीत बैठकी होत आहेत. या बैठकीला इच्छुकांनी उपस्थित रहावे असे आवाहन व्यवस्थापन समितीने केले आहे .
पिकाऊ जमीन आणि जंगल क्षेत्र कमी करून उर्वरित लागवडीखाली जमिनीत रासायनिक खतांचा आणि रासायनिक कीटकनाशकांचा वारे माप वापर करून पिके कमी वेळेत पोसवली जात आहेत. याचा प्रतिकूल परिणाम जमिनी बरोबरच मानवी आरोग्यावरही होत आहे. याला कुठेतरी आळा बसावा म्हणून सिद्धगिरी मठ जवळपास 36 वर्षापासून निसर्ग संवर्धनाचे आणि निसर्गपूरक शेतीच्या माध्यमातून कार्यरत आहे.रासायनिक शेतीमुळे मानवी आणि जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे. या अनुषंगानेच सिद्धगिरी मठ सेंद्रिय शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर प्रारंभ पासून भर देत आहे. याचे महत्त्व देशातील व जगातील नागरिकांना कळावे म्हणून सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव आयोजित केला आहे. या लोकोत्सवास जगभरातील तीस लाख लोक भेट देतील असा अंदाज आहे. याच्या पूर्वतयारीसाठी 55 उप समित्या कार्यरत झाल्या आहेत. कणेरीसह आसपासच्या गावात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, अन्नपुरवठा, स्वच्छता या पायाभूत सुविधांची कामे सुरू झाली आहेत.