
no images were found
अधिवेशनापूर्वी राज्यात मंत्रीमंडळ विस्तार होणार !
मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार याविषयी मंत्रीमंडळातील समावेशासाठी इच्छुक असलेल्यांकडून सातत्याने वेगवेगळ्या तारखा देण्यात येत आहेत. मात्र, आता राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी अर्थात फेब्रुवारीअखेर मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. सुमारे महिनाभर चालणाऱ्या अधिवेशनात विरोधकांना उत्तरे देण्यासाठी पुरेसे मंत्रीच नसतील, तर सरकारची पंचाईत होऊ शकते. त्यामुळे हे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मंत्रीमंडळ विस्तारचा मुहूर्त निवडण्यात येणार असल्याचे कळते.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी नऊ अशा १८ मंत्र्यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला. मात्र त्यानंतर ज्यांचा समावेश झाला नाही अशा नाराज आमदारांनी मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चेला हवा देण्यास सुरुवात केली. विशेषत: बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील काही इच्छुक आमदारांनी तर थेट प्रसारमाध्यमांपुढे जात मंत्रीमंडळाच्या विस्ताराविषयी भाष्य करायला सुरुवात केली. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जेमतेम पाच ते सहा आमदारांना मंत्री करण्यात येणार होते, तर भाजपच्या आमदारांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या पक्षातील दहा ते बारा जणांना मंत्रीपदाची शपथ देण्यात येणार होती. मात्र शिवसेनेमधून बाहेर पडलेल्या आमदारांना फार मंत्रीपदे न देता कमी लेखण्यात आले असा विनाकारण चुकीचा संदेश जाईल हे मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीला पटवून दिले. पहिल्या टप्प्यात समसमान मंत्रीपदे मिळायला हवीत, त्यानंतर आमदारांच्या संख्येनुसार मंत्रीपदे दिली तरी एकवेळ चालेल, अशाप्रकारचा तर्क शिंदे यांनी दिल्लीत मांडल्याचे समजते. विशेष म्हणजे त्यांचा हा तर्क दिल्लीवाल्यांना पटल्याने पहिल्या टप्प्यात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांना समसमान अर्थात प्रत्येकी नऊ मंत्रीपदे देण्यात आली.