no images were found
कोल्हापूरातील पाणीपुरठा योजना व्हेंटीलेटरवर – प्रशासन निष्क्रिय
शिंगणापूर येथील दुसरा पंप देखील नादुरुस्त
पाण्यासाठी जगरनगर प्रभागातील नागरिकांचा जलअभियंतांना घेराव लेखी आश्वासना नंतर सुटका
कोल्हापूर : गेल्या दहा दिवसांपासून जगरनगर लेआउट ४ मधील नागरिक पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार देऊनही कोणत्याही प्रकारची दखल महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आली नाही. या भागातील कनिष्ठ अभियंता, पाणी सोडणारे कर्मचारी यांच्यावतीने नागरिकांना कोणत्याही प्रकारची दाद न मिळाल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी प्रभागातील पाण्याची समस्या भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांना कळवली.
लगेचच याची दखल घेऊन राहूल चिकोडे यांनी पाणी प्रश्नासाठी जलअभियंता हर्षजीत घाडगे, कनिष्ठ अभियंता प्रिया पाटील, अभियंता जयेश जाधव यांना या विषयासाठी नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी जरगनगर येथे बोलावण्यात आले. संतप्त नागरिकांनी जलअभियंता यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना घेरून त्यांना धारेवर धरले. उपस्थित महिलांनी जलअभियंतांना १० दिवसांपासून पाण्याची समस्या असून अधिकारी उत्तरे देत नाहीत, फोन उचलत नाहीत असे सांगत पाण्यासारख्या मुलभूत गरजेसाठी आक्रोश करत नाही तोपर्यंत पाणी मिळणार नाही का ? असा सवाल उपस्थित केला. यावेळी देखील नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी सर्व अधिकारी निरुत्तर झाले.
नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी भागातील नागरिकांना पाणी केव्हा येणार ? हे पंप गेली वर्षभर नादुरुस्त आहेत यांची पंपाची आयुर्मयादा संपली आहे तरीसुद्धा यावर ठोस भूमिका का घेतली नाही ? अशी विचारणा करत पाणी केव्हा येणार हे लेखी लिहून दिल्याशिवाय येथून सोडणार नाही अशी भूमिका घेतली.
वरील विषय ऐकल्यानंतर जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी शिंगणापूर पंपिंग स्टेशन मधील पाच पैकी एक पंप नादुरुस्त असून आता दुसराही पंप नादुरुस्त झाल्यामुळे पाण्याचा उपसा होत नसून ही समस्या येत असल्याचे मान्य केले. तसेच 25 तारखेपर्यंत या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल असे लेखी आश्वासन दिले. लेखी आश्वासनावर जलअभियंता, कनिष्ठ अभियंता, अभियंता यांच्या सह्या नागरिकांच्या समोर घेऊन त्यांना या ठिकाणाहून सोडण्यात आले.
यावेळी समीर दांडेकर, सलील दांडेकर, अभिजीत पाटील, विजय जोशी, संजय देशपांडे, सौ मनाली पाटील, सौ दांडेकर, सौ पाटील, सचिन साळोखे, राजू होले, पी. एम. पाटील, जयसिंग खाडे, एम.आर.कुलकर्णी, शरद विधाते, दिनकर पाटील, मुकुंद वडेर, मुकुंद अभ्यंकर, कुंभार, अमोल शिंदे, अशोक चव्हाण यांच्यासह लेआऊट ४ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.