Oplus_131072
no images were found
कोल्हापूर व नांदेडमध्ये बेकायदेशीर ‘कम्फर्ट’ मच्छर अगरबत्तीवर छापे
कोल्हापूर, : महाराष्ट्र कृषी विभाग यांनी बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्तीविरोधात कारवाई करत कोल्हापूर आणि नांदेडमध्ये छापे टाकले. ‘कम्फर्ट’ नावाची मच्छर अगरबत्ती विक्री करणाऱ्या दुकानांतून मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला.
कोल्हापूरमधील गांधीनगर येथील मनोज नॉव्हेल्टीज येथे छापा टाकून ‘कम्फर्ट’ अगरबत्ती जप्त करण्यात आली. तर नांदेडमधील खडकपुरा परिसरातील गुरुनानक मार्केटमधील आर. के. सुरतवाला या दुकानातून १,०५६ पाऊच जप्त करण्यात आले. अण्णाभाऊ साठे चौकाजवळील पारसेवार प्रोव्हिजन स्टोअर्समधून १० बॉक्स जप्त करण्यात आले.
प्रयोगशाळा तपासणीत या अगरबत्तीमध्ये डायमेफ्लुथ्रिन या अनधिकृत कीटकनाशकाचे प्रमाण आढळले. संबंधित उत्पादक कंपनीकडे आवश्यक परवाना व केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (CIBRC) ची मंजुरी नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कीटकनाशक कायदा १९६८ व नियम १९७१ अंतर्गत ही विक्री बेकायदेशीर ठरते.
होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (HICA) ने या कारवाईचे स्वागत करत किरकोळ व घाऊक विक्रेत्यांना अशा उत्पादनांचा साठा न करण्याचे आवाहन केले आहे. ग्राहकांनी ‘CIR’ क्रमांक असलेली, सरकारमान्य उत्पादनेच खरेदी करावीत, असेही सांगण्यात आले आहे.
राज्यभर अशा बेकायदेशीर उत्पादनांवर पुढील काळातही कारवाई सुरू राहणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.