Home सामाजिक महिलांनी विज्ञानाचे आधुनिक ज्ञान आत्मसात करावे: डॉ. अपर्णा कलावते

महिलांनी विज्ञानाचे आधुनिक ज्ञान आत्मसात करावे: डॉ. अपर्णा कलावते

2 second read
0
0
23

no images were found

महिलांनी विज्ञानाचे आधुनिक ज्ञान आत्मसात करावे: डॉ. अपर्णा कलावते

कोल्हापूर,(प्रतिनिधी): विकसित भारताच्या जडणघडणीमध्ये महिलांचे मोलाचे योगदान राहणार असून त्यासाठी त्यांनी संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसह विज्ञानाच्या क्षेत्रातील आधुनिक ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (पुणे) येथील वरिष्ठ संशोधक डॉ. अपर्णा कलावते यांनी केले.

शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमाच्या सांगता समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव होत्या, तर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, डॉ. एस.आर. यंन्कंची उपस्थित होते.

डॉ. अपर्णा कलावते यांनी विज्ञान क्षेत्रातील महिलांची परंपरा आणि योगदान यावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, भारतीय विज्ञान क्षेत्राला जानकी अम्मल, शकुंतला देवी, रेशेल कार्सन, असीमा चटर्जी, डॉ. इंदिरा हिंदुजा इत्यादी अनेक प्रभावी महिला संशोधक, शास्त्रज्ञांनी योगदान देऊन समृद्ध बनविले आहे. विपरित परिस्थितीशी दोन हात करीत त्यांनी आपल्या संशोधनाची वाट चोखाळली. त्यांचा आदर्श ठेवून आजच्या युवतींनी विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्यास सज्ज व्हायला हवे. त्यासाठीच केंद्र सरकारने यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची मध्यवर्ती संकल्पनाच ‘विज्ञान क्षेत्रातील महिला: विकसित भारतासाठी प्रेरक शक्ती’ अशी ठेवली आहे. महिलांचे सर्वंकष योगदान लाभले तरच भारत खऱ्या अर्थाने विकसित होईल. म्हणून महिलांनी कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द करीत असताना आणि वावरत असताना संकोच बाळगू नये, आत्मविश्वासाने पुढे यायला हवे. विद्यार्थ्यांनी लघु आणि दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करून ध्येयवादी वृत्तीने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित (STEM) या क्षेत्रांत महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवून संशोधन व नवोपक्रमात आघाडी घेण्यासाठी सध्या सुवर्णकाळ आहे. या संधीचा विद्यार्थिनींनी लाभ घ्यायला हवा. विकसित भारताला अपेक्षित विज्ञान क्षेत्राच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीतील योगदान देण्यासाठी त्यांनी सिद्ध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. डॉ. सुनील गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विज्ञान दिन उपक्रमाच्या समन्वयक डॉ. माधुरी वाळवेकर यांनी संपूर्ण उपक्रमाचा अहवाल सादर केला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. नितीन कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विविध अधिविभागांतील शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…