
no images were found
पुण्यात जी-२० परिषदेचे आयोजन
पुणे : भारत तसेच ऑस्ट्रेलिया व ब्राझिल यांच्यातर्फे जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सोमवारपासून जी-२० परिषदेला सुरुवात झाली आहे. २ दिवस होणाऱ्या या बैठकीमध्ये २० देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले. तसेच जागतिक बॅंक, एशियन बॅंकेच्याही प्रतिनिधींचा त्यात समावेश असेल. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत बैठकीला प्रारंभ होईल. पायाभूत सुविधांसाठीचा जाहिरनामा या बैठकीत तयार होईल. यंदाच्या जी २० परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे.
त्यामुळे जी-२० परिषदेच्या बैठका देशात होत असून त्यातील पायाभूत सुविधांची बैठक शहरातील सेनापती बापट रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये होणार आहे. रविवारी केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे सहसचिव सोलोमोन अरोकियाराज यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार बैठकीत शहरांचा विकास ते शाश्वत जीवनशैली असे एकूण सात सत्र होतील. मंगळवारी बैठकीचा समारोप होईल.
देशातील शहरांचा विकास कसा करता येईल, शहरीकरणामुळे झालेल्या समस्यांवर उपाययोजना शोधणे, शहरे विकसित करण्यासाठी जागतिक स्तरावरून निधी जमा करणे, शाश्वत जीवनशैलीकडे आदी विषयांवर बैठकीत चर्चा होईल. उदघाटनानंतर जगभरातील पायाभूत सुविधा, वाढते शहरीकरण आणि त्या समोरची आव्हाने यावर चर्चा होईल. दुपारी १ ते ३ दरम्यान ‘शहरीकरण’ या विषयावर परिसंवाद होईल. नंतर दु. ४ ते सायं. ७ वाजेपर्यंत सावित्रीबाई फुले विद्यापीठात जगभरातून आलेल्या पाहुण्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात भारतीय लोककला, लोकसंगीत व लावणी असे कार्यक्रम करून मराठी संस्कृतीची ओळख करून दिली जाणार आहे. यावेळी पीआयबीच्या संचालिका मोनीदिया मुखर्जी उपस्थित होत्या.